अशोक स्तंभावरून टीका होताच केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

• 08:55 AM • 13 Jul 2022

नव्या संसद भवनातलं राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभावरून वाद निर्माण झाला आहे. या अशोक स्तंभामध्ये जे सिंह दाखवण्यात आले आहेत ते अतिशय उग्र आणि हिंस्त्र स्वरूपातले दाखवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमुद्रेमध्ये बदल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावरून मागचे तीन दिवस वाद सुरू आहे. अशात आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी […]

Mumbaitak
follow google news

नव्या संसद भवनातलं राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभावरून वाद निर्माण झाला आहे. या अशोक स्तंभामध्ये जे सिंह दाखवण्यात आले आहेत ते अतिशय उग्र आणि हिंस्त्र स्वरूपातले दाखवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमुद्रेमध्ये बदल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावरून मागचे तीन दिवस वाद सुरू आहे. अशात आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी?

सारनाथ या ठिकाणी असलेल्या अशोक स्तंभाकडे बारकाईने बघितलं तर त्यावरचे सिंहही तेवढेच क्रोधित किंवा शांत दिसतील. अशोक स्तंभाची प्रतिकृती संसदेत बसवण्यात आली आहे. ही प्रतिकृती भव्य उंचीची आहे. सारनाथमध्ये असलेला स्तंभ हा जमिनीवर आहे. तर नवा अशोक स्तंभ जमिनीपासून ३३ मीटर उंचीचा आहे. त्यामुळे हे सिंह क्रोधित, उग्र किंवा अधिक चिडलेले दिसू शकतात. मात्र एका विशिष्ट अंतरावरून याकडे पाहिलं तर सारनाथच्या अशोक स्तंभात आणि या अशोक स्तंभात काहीही फरक दिसत नाही.

नव्या अशोकस्तंभावर (Ashoka Pillar) काय आहे आक्षेप?

नव्या अशोक स्तंभावर असलेले सिंह हे पूर्वीच्या स्तंभावरील सिंहांपेक्षा आक्रमक आणि लढण्याच्या पवित्र्यात आहेत असं दाखवण्यात आलं आहे.

राष्ट्रीय प्रतीक बदललं गेलं आहे, मोदींच्या मनाप्रमाणे हा अशोकस्तंभ घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे

अशोकस्तंभाचं अनावरण करण्याच्या कार्यक्रमात एकाही विरोधकाला निमंत्रित करण्यात आलं नाही

राष्ट्रीय प्रतीकात बदल करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही का म्हणू नये हा प्रश्नही विरोधक विचारत आहेत

ट्विटरवरही नव्या अशोकस्तंभाची चर्चा

हरदीप सिंह पुरी यांनी जे ट्विट केलं आहे त्यामध्ये त्यांनी सारनाथ मध्ये असेल्या मूळ अशोक स्तंभाचाही फोटो पोस्ट केला आहे. तसंच पूर्वी ज्या दहा रूपयांच्या नोटेवर अशोक स्तंभ म्हणजेच आपली राजमुद्रा होती तो फोटो आणि २ रूपयांचं नाणं असेलली राजमुद्राही दाखवली आहे. या सगळ्यातही सिंह हे उग्र किंवा शांत अशाच स्वरूपाचे दिसतात. अकारण वाद करण्याची काहीही गरज नाही असंही हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. तसंच संसदेत उभारण्यात आलेला अशोक स्तंभ हा मूळ अशोकस्तंभाचीच प्रतिकृती आहे त्यात काहीही बदल करण्यात आलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे अशोक स्तंभाचा इतिहास?

कोणताही देश म्हटला की त्या देशाची एक राजमुद्रा किंवा राष्ट्र प्रतीक असतं. भारत त्याला अपवाद नाही. सम्राट अशोकाने उभा केलेला अशोक स्तंभ हा भारताची राजमुद्रा आहे. संपूर्ण जगात भारताच्या इतिहासाची चर्चा होते. कारण भारत हा गौरवशाली इतिहास लाभलेला एक देश आहे. या इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे ते अशोक स्तंभाचं. २६ जानेवारी १९५० या दिवशी भारताने अशोक स्तंभ ही आपल्या देशाची राजमुद्रा असेल हे निश्चित केलं. कारण अशोक स्तंभ हे संस्कृती, शासन आणि शांततेचं सर्वात मोठं प्रतीक आहे.

अशोक स्तंभाचा इतिहास मात्र शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. इसवी सन पूर्व २७३ मध्ये आपल्याला त्यासाठी डोकवावं लागेल. हा असा काळ होता ज्या काळात भारतात मौर्य राजे राजे राज्य करत होते. सम्राट अशोक हा त्यांच्यापैकीच एक. सम्राट अशोक हा त्याच्या काळातला सर्वात क्रूर शासक मानला जात असे. मात्र कलिंगाचं युद्ध झालं त्या युद्धात जो रक्तपात आणि नरसंहार सम्राट अशोकाने पाहिला त्याचा सम्राट अशोकाच्या मनावर गहिरा परिणाम झाला. ज्यानंतर सम्राट अशोकाने राज्य त्यागलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला.

बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सम्राट अशोकाने देशभरात या धर्माची प्रतीकं तयार केली. त्यातलं महत्त्वाचं प्रतीक होतं ते चार दिशांना गर्जना करणाऱ्या चार सिंहाचं. चार सिंह असलेला हा स्तंभ सम्राट अशोकाने उभारला. त्यामुळेच या स्तंभाला अशोक स्तंभ असं म्हटलं जातं. भगवान बुद्ध यांना सिंहाचं रूप मानलं जातं. त्यांच्या अनेक नावांपैकी शाक्य सिंह, नरसिंह ही काही उदाहरणं देता येतील.

एवढंच नाही तर सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांनी जो उपदेश दिला त्या उपदेशाला सिंह गर्जना म्हटलं गेलं आहे. त्यामुळेच अशोक स्तंभावर असेलल्या चार सिंहांच्या प्रतीकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. भारताने हेच प्रतीक आपली राजमुद्रा म्हणून स्वातंत्र्यानंतर स्वीकारलं आहे.

    follow whatsapp