नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज (10 नोव्हेंबर) घडलेल्या भीषण कार स्फोट प्रकरणावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेत अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजते, ज्यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली संवेदना व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधींचे ट्विट
"दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटाची बातमी अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद घटनेत अनेक निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते, जे मनाला व्यथित करणारे आहे.'
'या दुःखाच्या प्रसंगी आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शोकसंतप्त कुटुंबीयांबरोबर मी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना माझ्या संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो." असं ट्वीट राहुल गांधींनी केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गेट नंबर 1 जवळ आज संध्याकाळी सुमारे 6.52 वाजता एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात सध्या तरी 10 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका प्रचंड होता की त्यामुळे जवळच्या वाहनांना आग लागली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हे ही वाचा>> Delhi Blast: दिल्ली स्फोटात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मी स्वत...'
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट इतका भीषण होता की त्याचा धक्का दूरवर जाणवला. दिल्ली पोलीस, NIA(राष्ट्रीय तपास संस्था) आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. आतापर्यंत स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नसले तरी हे एक नियोजित हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय प्रतिक्रिया
राहुल गांधी यांच्याशिवाय अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सुरक्षेत गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पोलीस आणि सरकारकडून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, काही नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर काहींनी हे प्रकरण केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेच्या अपयशाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा>> राजधानी दिल्ली हादरली.. लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटात तब्बल 10 जणांचा मृत्यू, मुंबईत हायअलर्ट जारी
शोक आणि सहानुभूती
या घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी देशभरातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू असून, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला असून गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा करून तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील तपास
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासह एनआयए आणि इतर तपास संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत. स्फोटामागील कारण आणि जबाबदार व्यक्तींना शोधण्यासाठी तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीसह मुंबई, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि कोलकाता यांसारख्या राज्यांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही घटना दिल्लीसारख्या राष्ट्रीय राजधानीत घडल्याने देशभरात चिंता व्यक्त होत असून, सर्वांचे लक्ष आता तपासाकडे लागले आहे.
ADVERTISEMENT











