सगळ्याचं लक्ष असलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. महापालिका निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्याला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT
बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून उत्तल दिलं.
अतुल भातखळकर काय म्हणाले?
‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. बेळगावात मराठी माणूस हरला नसून, शिवसेना हरली आहे. भाजपचे किमान १५ मराठी उमेदवार जिंकले आहेत. ही फशिवसेना असल्याचं मराठी माणसाच्या लक्षात आले आहे’, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
महापालिका निकालानंतर भातखळकर यांनी तीन ट्विटस् केले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात, ‘लोकांना मराठी अस्मितेची गोळी आणि फक्त मलाच तुपाची पोळी… ही पक्षप्रमुखांची शिवसेना नीती ओळखून मराठी जनांनी बेळगावात सणसणीत लाथ घातली. आता कळवळून काय उपयोग? काही दिवसांनी मुंबईतही हेच होणार आहे’, असा इशारा भातखळकर यांनी दिला.
तिसऱ्या ट्वीटमध्ये भातखळकर यांनी संजय राऊतांना बेळगाव महापालिका निकालावरून चिमटा काढला. संजय राऊत बेळगावात प्रचाराला गेले होते ना???’, असं म्हणत भातखळकरांनी संजय राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
‘बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं शहीद झाली. महाराष्ट्रातील 69 लोकं गेले. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता, मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर टीका केली होती.
‘बेळगावामध्ये मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल आज महाराष्ट्रात काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात इतका नालायकपणा झाला नाही. मराठी माणसाच्या बाबतीत आतापर्यंत गद्दारी कोणी केली नव्हती’, असंही राऊत म्हणाले होते.
‘मराठी माणूस माफ करणार नाही’
‘महाराष्ट्रात अनेकांना वेदना होत आहे. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. मराठी माणूस हरल्याबद्दल त्यांच्यात अस्वस्थता आहे आणि तुम्ही पेढे वाटता. ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल, पण मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणूस माफ करणार नाही’, असा इशाराही राऊतांनी दिला.
ADVERTISEMENT
