केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भू पृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी सोमवारी (8 नोव्हेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दिवशी नितीन गडकरी पालखी मार्गाच्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पालखी मार्गाचे भूमिपूजन केलं जाणार आहे. दिवेघाट ते मोहोळ हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 221 किलोमीटरचा आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा 130 किमी इतका आहे.
ADVERTISEMENT
आषाढी वारीसाठी आळंदी आणि देहू या ठिकाणाहून लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर चालत असतात. विठूरायाच्या दर्शनाची आस या सगळ्यांना लागलेली असते. वारीचा हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाऱखा असतो. गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही वारी परंपरा जपली गेलेली नाही. मात्र यावर्षी वारीला संमती मिळू शकते. वारकरी ज्या मार्गावरून चालतात तो रस्ता भव्य आणि सुंदर असावा या हेतूने या मार्गाचा विस्तार होतो आहे. त्यामुळेच हा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. या प्रकल्पाचं भूमिपूजन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग 965 हा रस्ता चार पदरी होणार आहे तर 965G हा रस्ता तीन पदरी होणार आहे. या दोन्हीसाठीचा खर्च अंदाजे 11,090 कोटी इतका होऊ शकतो असा अंदाज आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंढरपूरला जोडणाऱ्या इतरही महामार्गांचं लोकार्पण करणार आहेत. राज्यातील हे महामार्ग एकूण 223 किमीचे आहेत.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पंढरपूर ते आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पंढरपूर ते देहू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू केले आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी हे दुपारी 12 वाजता पंढरपूरमध्ये येणार आहेत. सर्वात आधी ते विठ्ठल आणि रूक्मिणीचं दर्शन घेतील. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन करून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे इतर दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत. कार्तिकीच्या यात्रेत वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
