“एकतर निर्लज्ज असाव लागतं किंवा काँग्रेस अन् लाचार सेनेसारखं…”; भाजपचं व्हिडीओतून टीकास्त्र

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतेही सहभागी झाले. यात चर्चा झाली ती आदित्य ठाकरेंच्या यात्रेतील सहभागाची. त्यावरूनच भाजपनं व्हिडीओतून राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण डागलेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

13 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:37 AM)

follow google news

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतेही सहभागी झाले. यात चर्चा झाली ती आदित्य ठाकरेंच्या यात्रेतील सहभागाची. त्यावरूनच भाजपनं व्हिडीओतून राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण डागलेत.

हे वाचलं का?

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले नाही, मात्र आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी पदयात्रेत हजेरी लावली.

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चाही झाली आणि त्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांचीही! आदित्य ठाकरेंच्या भारत जोडो यात्रेवरून भाजपनं बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेचा दाखला देत निशाणा साधलाय.

राहुल गांधी-आदित्य ठाकरे : भारत जोडो यात्रेबद्दल भाजपनं काय म्हटलंय?

“वारसा हा विचारांचा असतो. फक्त रक्ताच्या नात्यानं कुणी वारसदार ठरत नसतो, याचा पूर्णपणे विसर पडलेले दोन नातू. राहुल व आदित्य सध्या भारत जोडो सर्कशीत रममाण आहेत. ही सत्तेची हावच आहे, जी दोघांना एकत्र येण्यास भाग पाडते”, असं म्हणत भाजपनं आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींना लक्ष्य केलंय.

“हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभी हयात ज्या गांधी घराण्याविरुद्ध लढण्यात घालवली, त्या गांधी घराण्याच्या पायाशी त्यांचे चिरंजीव व नातू लोळण घेताना संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधीने ब्रिटिशांचे एजंट, माफीवीर अशी खालच्या भाषेत टीका वेळावेळी केलीये. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्टायपेंट घेतल्याचंही सांगितलंय”, असंही भाजपनं म्हटलंय.

“काँग्रेसच्या स्थापनेत ब्रिटिश अॅलन ह्यूमचा वाटा असल्यानं काँग्रेसला ब्रिटिशांची एजंट पार्टी म्हणणार का? पु.ल. देशपांडेंच्या भाषेत थोडक्यात सांगायचं, तर आपला दर्जा काय? आपलं कर्तृत्व काय? याचा अजिबात विचार न करता राहुल गांधी मत ठोकून मोकळा होतो”, अशी टीका भाजपनं राहुल गांधींवर केलीये.

“उद्धव ठाकरेंची लाचार सेना एकीकडे मराठी अस्मिता, मराठी माणूस याचा राग आळवत असली, तरी मराठी साहित्यिक, क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधींच्या पायाशी लोळण घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही”, असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या भारत जोडो यात्रेवरून भाजपनं निशाणा साधलाय.

सावरकरांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवरही भाजपची टीका

“जामीनावर बाहेर असलेले संजय राऊत एकीकडे स्वतःला सावरकरांच्या विचारांचे वारसदार म्हणवतात, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे सावरकरांचा द्वेष करणाऱ्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्याचा आनंद व्यक्त करतात. सोयीनुसार एव्हढं परस्पर विरोधी वागायला एकतर निर्लज्ज असावं लागत किंवा काँग्रेस व लाचार सेनेसारखं राजकीय स्वार्थी तरी असावं लागतं”, अशी टीका भाजपकडून करण्यात आलीये.

    follow whatsapp