तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढल्यामुळे चर्चेत आलेला पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात कारवाईचा पोलीसांनी फास आवळायला सुरुवात केली आहे. खूनाच्या आरोपातून जेलमधून सुटल्यानंतर गजा मारणेच्या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन जागं झालं असून मारणे समर्थकांविरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून गजा मारणे व त्याच्या काही सहकाऱ्यांविरोधात वडापाव आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे न देता फुकट नेल्यामुळे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
तळोजा जेलमधून सुटल्यानंतर गजा मारणेच्या शेकडो गाड्यांचा ताफा उर्से टोलनाक्याजवळ आला होता. इकडे गजा मारणेचं त्याच्या समर्थकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मारणे समर्थकांनी टोल नाक्यावर टोल न देता आपली वाहनं पुढे काढली. तसेच एक्स्प्रेस हायवे वरील फुडमॉलवर वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन त्याचे पैसेही दिले नाहीत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाल्यामुळे गजा मारणे व त्याच्या समर्थकांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजा मारणे टोळी मोक्का लावण्यास पात्र !
जेलमधून सुटल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीविरोधात गजा मारणे आणि समर्थकांविरोधात शिरगाव चौकी आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरगाव पोलीसांनी आतापर्यंत १४ वाहनं जप्त केली असून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. याचसोबत दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गजा मारणेची टोळी आता मोक्का अंतर्गत कारवाईसाठी पात्र झाली आहे. याविरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीसांनी पावलं उचलली असून पिंपरी-चिंचवड शहरात मारणे टोळीची पाळंमुळं खणून काढली जातील असं आश्वासन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलं आहे.
ADVERTISEMENT
