‘सुप्रियाताई, तुम्ही काळजी करू नका’; ‘दोन मुख्यमंत्री पाहिजे’च्या टीकेवर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

मुंबई तक

10 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:47 AM)

‘सर्वसामान्य लोकांची कामं होत नाहीयेत, त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला डिवचलं. आता सुप्रिया सुळेंच्या या टीकेला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. राज्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गटाचं सरकार अस्तित्वात आलं. राज्यात […]

Mumbaitak
follow google news

‘सर्वसामान्य लोकांची कामं होत नाहीयेत, त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला डिवचलं. आता सुप्रिया सुळेंच्या या टीकेला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. राज्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गटाचं सरकार अस्तित्वात आलं. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर विरोधी बाकांवरील नेते सत्ताधारी बाकांवर आले, तर सत्ताधारी विरोधक बनले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी जोरात होताना दिसतेय. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं जात असल्याचं दिसतंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या सततच्या भेटीगाठीवरून चिमटा काढला. त्याला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारबद्दल काळजी करू नका असं म्हणत उत्तर दिलं.

चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला काय उत्तर दिलं?

सुप्रिया सुळे यांच्या विधानावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही खूप फिरतात. प्रशासनात काहीही गडबड नाहीये. सगळं व्यवस्थित चाललं आहे. त्यांच्या काळातील सर्व प्रलंबित विषय त्यांनी पूर्ण करत आणले आहेत.”

“कोविड काळात ज्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. त्यांची फी माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यात आता वैद्यकीय आणि कृषी या दोन्हींचा समावेश करणार आहोत. त्यामुळे अतिशय व्यवस्थित प्रशासन चाललं आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरही पडत नव्हता”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

“सुप्रिया सुळे जे म्हणाल्या की, महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्याची गरज आहे. एक फिरणारा आणि एक प्रशासन सांभाळण्यासाठी. तर सुप्रियाताई, तुम्ही काळजी करू नका. हे फिरतही आहेत आणि सरकारही उत्तम चालवत आहेत”, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं.

सुप्रिया सुळे एकनाथ शिंदेंबद्दल नक्की काय म्हणाल्या होत्या?

एकनाथ शिंदे हे सातत्यानं भेटीगाठी आणि गणपती दर्शन घेताना दिसत होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, “सध्या लोकांची कामं होत नाहीयेत. मुख्यमंत्री मंत्रालयात नसतात. त्यातच आता गणेशोत्सव आहे. पुढेही अनेक उत्सव येतील. त्यामुळे महाराष्ट्राला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक फिरायला आणि एक मंत्रालयात बसून कामं करायला. एक मुख्यमंत्री मंत्रालयात बसून काम करतील, दुसरे मुख्यमंत्री वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता.

    follow whatsapp