Eknath Shinde : शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शिंदे सरकार पाठीशी भक्कमपणे उभं

मुंबई तक

25 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

मुंबई : पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यासाठी विभागीय पातळीवर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जातील. पण कोणतही संकट येऊ द्या, तुम्ही खचून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलं. ते वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित ‘अन्नदात्यासोबत दिवाळी’ कार्यक्रमात बोलत होते. मंगळवारी सकाळी गडचिरोलीमध्ये पोलिसांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यासाठी विभागीय पातळीवर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जातील. पण कोणतही संकट येऊ द्या, तुम्ही खचून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलं. ते वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित ‘अन्नदात्यासोबत दिवाळी’ कार्यक्रमात बोलत होते.

हे वाचलं का?

मंगळवारी सकाळी गडचिरोलीमध्ये पोलिसांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर संध्याकाळी वर्षा बंगल्यावर ‘अन्नदात्यासोबत दिवाळी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून ३ असे महाराष्ट्रातून १०० पेक्षा जास्त शेतकरी सहकुटुंब कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. 

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री म्हणाले, सध्या दिवाळी सगळेजण साजरी करत आहेत. कोणी गडकिल्ले बनवत आहे  तर कोण रांगोळी काढत आहेत. राज्यभर आनंदात दिवाळी साजरी होत आहे. पण पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेल्यानंतर शेतकऱ्यावर संकट येऊ नये असं साकडं पांडुरंगाला घातलं होतं. आता मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभं आहे. यावेळी शिंदे यांनी आजवर शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचे आकडेही सांगितले.

एकनाथ शिंदेंची दिवाळी गडचिरोली पोलिसांसोबत :

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. भामरागड तालुक्यातील धोडराज येथील पोलीस जवानांसोबत दिवाळी कार्यक्रमात शिंदे यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी अतिदुर्गम आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अतिदुर्गम पोलीस ठाण्यात पोहचून दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचे मंगळवारी सकाळी विमानाने नागपुरात आगमन झाले. तिथून हेलिकॉप्टरने ते धोडराजला रवाना झाले. धोडराज येथील पोलीस ठाण्याच्या आवारातील हेलिपॅडवर वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जवानांसोबत दिवाळी साजरी करतानाच त्यांनी पोलीस जनजागरण कार्यक्रमात उपस्थिती लावली. तसंच शिंदे यांच्या हस्ते धोडराज पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन देखील करण्यात आले. यानंतर त्यांनी धोडराज येथील स्थानिकांशी देखील संवाद साधला.

    follow whatsapp