Crime News: उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर 20 पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने आपल्याच पतीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केल्याचं वृत्त आहे. पीडितेच्या वडिलांनी मोठ्या अपेक्षा ठेवून मुलीचं लग्न पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणासोबत लावून दिलं होतं. त्यांनी लग्नासाठी जवळपास 50 लाख रुपयांहून अधिक खर्च केला. पण कुटुंबियांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या मुलीला सासरी खूप छळ सहन करावा लागेल. संबंधित महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, तिला सॅनिटायझर पिण्यास सुद्धा भाग पाडण्यात आलं.
ADVERTISEMENT
महिलेने तिची पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करताना सांगितलं की, तिच्या दिराने तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं. तसेच, सासऱ्याने तिला मुलगा होण्यासाठी औषधे घेण्यास भाग पाडलं. पीडितेच्या पतीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याचा देखील आरोप आहे. तसेच, लग्नात इतका खर्च करुन सुद्धा सासरचे लोक महिलेकडे स्कॉर्पियो कारची मागणी करायचे. आता, या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
हुंडा म्हणून स्कॉर्पिओ कारची मागणी
26 जानेवारी 2023 रोजी मेरठमधील एका महिला कॉन्स्टेबलचं पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं. महिलेच्या कुटुंबियांनी हुंडा म्हणून लग्नात जवळपास 50 लाख रुपये खर्च केले. पण लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच, पीडितेच्या सासरच्या लोकांनी माहेरहून दिलेल्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचं म्हणायला सुरुवात केली. त्यांनी लगेच दुसऱ्या स्कॉर्पिओ कारची मागणी केली.
हुंड्यासाठी मारहाण अन् शिवीगाळ
त्यानंतर, संबंधित महिला स्कॉर्पिओ गाडीची मागणी पूर्ण करू न शकल्याने, तिचा पती, सासू कुंती देवी आणि सासरे राजेश्वर प्रसाद शर्मा यांनी पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. त्यांनी तिला मारहाण केली आणि शिवीगाळही केली. इतकेच नव्हे तर, तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.
हे ही वाचा: Inside Story: अमित शाहांनी एका Meeting मध्ये फिरवला सगळा गेम, शिंदेंना पुन्हा केलं आपलंसं अन् रवींद्र चव्हाणांना दिला ‘तो’ आदेश!
एके दिवशी, पीडित महिलेचा पती आणि सासऱ्यांनी तिला गरोदरपणात मुलगा होण्यासाठी औषधे घेण्यास दबाव आणला. यासाठी तिने नकार दिल्यावर, तिच्या पती आणि सासऱ्यांनी तिला मारहाण केली. तिच्या गरोदरपणात झालेल्या या निर्दयी छळामुळे, जन्मलेल्या तिच्या मुलाला अजूनही झटके येतात आणि तो पूर्णपणे निरोगी नाही. शिवाय, मुलाच्या बारशाच्या वेळी सुद्धा सासरच्या लोकांनी आणखी 5 लाख रुपये मागितले. ते पैसे देण्यासाठी महिलेने नकार दिल्यानंतर सुद्धा तिला बेदम मारहाण करण्यात आली.
दिराने केला बलात्कार
याव्यतिरिक्त, पीडितेने एकदा तिच्या नवऱ्याला त्याच्या वहिनीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यावेळी, महिलेने पतीला जाब विचारला असता तिच्या सासरच्यांनी तिला शिवीगाळ केली, मारहाण केली इतकेच नव्हे तर तिला मारून टाकण्याच्या उद्देशाने तिला सॅनिटायझर पिण्यास भाग पाडलं. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि तिला तीन दिवस मेरठमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित महिला कॉन्स्टेबलच्या दिराची तिच्यावर वाईट नजर होती. 5 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी दिराने बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी मेरठच्या खरखौदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा: 55 वर्षीय नवरदेव, अविवाहित असल्याचं सांगून 4 लग्न केले, पण तिसऱ्या पत्नीने चांगलीच अद्दल घडवली
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती खोट्या कारणांवरून तिच्यापासून घटस्फोट घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो तिला धमकी सुद्धा देत आहे. अखेर, पीडितेने यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











