Inside Story: अमित शाहांनी एका Meeting मध्ये फिरवला सगळा गेम, शिंदेंना पुन्हा केलं आपलंसं अन् रवींद्र चव्हाणांना दिला ‘तो’ आदेश!
भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित महापालिका निवडणूक लढवणार आहेत. पण हे नेमकं कसं घडलं याचीच इनसाइड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT

मुंबईः राजकीय वैर भाव कधीच कायमचे नसतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढण्याची भाषा करणारा भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यांच्यातील दुरावा संपला आहे. दोन्ही पक्षांनी आगामी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुका ‘महायुती’ म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर सगळा खेळच बदलला
आठवडयाभरात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आधी अमित शाह आणि नंतर एकनाथ शिंदेंसोबत बैठका केल्या. ज्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “मुंबईसह सर्व महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युती हवीच, असा पक्षश्रेष्ठांचा ठाम आदेश आहे.”
मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात जोरदार धुमश्चक्री सुरू होती. याच गोष्टी शिंदेंनी अमित शाहांच्या कानावर घातल्या होत्या. ज्यानंतर अमित शाहांनी २ दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाणांना दिल्लीत बोलावलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये तासाभराहून अधिक वेळ बंद दाराआड चर्चा झाली आणि इथूनच युतीबाबतचा सगळा खेळ बदलला.










