चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सुंदरलाल बहुगुणा यांच्यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स, ऋषीकेश या ठिकाणी उपचार सुरू होते. सुंदरलाल बहुगुणा हे 94 वर्षांचे होते.
ADVERTISEMENT
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुंदरलाल बहुगुणा यांना मधुमेह म्हणजेच डायबेटिस ही सहव्याधी होती. कोरोना संसर्ग झाल्यानं त्यांना निमोनियाही झाला होता. तसंच त्यांना इतरही आजार होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 86 वर आली होती. 8 मे रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनीही शोक व्यक्त केला आहे.
1970 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन देशभरात पसरलं, चिपको आंदोलन हे त्याचाच एक भाग होतं. सुंदरलाल बहुगुणा यांनी गौरा देवी आणि अन्य सहकाऱ्यांसह चिपको आंदोलनाची सुरूवात केली होती. 26 मार्च 1974 ला चमोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला झाडांना मिठी मारून उभ्या राहिल्या, त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण देशभरात पसरलं.
महात्मा गांधी यांच्या विचारांचा सुंदरलाल बहुगुणांवर प्रभाव पडला होता. 70 च्या दशकात हिमालयात वृक्षतोड झाली त्याविरोधात त्यांनी अत्यंत शांतपणे आंदोलन केलं. तसंच त्यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेलं चिपको आंदोलन देशभरात पसरलं होतं.
आधी आमचा जीव घ्या मग झाडं तोडा..
जेव्हा 1974 मध्ये चमोली गावातील महिला या झाडांना चिटकून उभ्या राहिल्या तेव्हा या आंदोलनाला चिपको आंदोलन हे नाव पडलं. झाडं तोडण्यासाठी आलेल्या सगळ्यांना त्यांनी हे सांगितलं की आधी आमचा जीव घ्या त्यानंतर झाडांवर कुऱ्हाड चालवा. अखेर या आंदोलनाचा परिणाम हा झाला की वृक्षतोड करण्याचा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला. या आंदोलनामुळे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात जनजागृती झाली.
या आंदोलनामुळे तत्कालीन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वन संरक्षण कायदा करावा लागला. ज्या अंतर्गत ज्या भागांमध्ये वृक्ष तोड सुरू होती त्या तोडकामाला 15 वर्षे स्थगिती देण्यात आली. एवढंच नाही तर केंद्र सरकारने तेव्हा पर्यावरण मंत्रालयाचीही स्थापना केली.
ADVERTISEMENT
