केसरकरांना सिंधुदुर्गपासून लांब ठेवण्यात राणेंना यश? भाजपचे रविंद्र चव्हाण नवे पालकमंत्री

मुंबई तक

• 05:41 AM • 25 Sep 2022

मुंबई : अखेरीस राज्यातील सर्व जिल्ह्यांना हक्काचे पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री उशिरा पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. यात भाजपकडे 21 तर शिंदे गटाकडे 15 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय शिंदे गटानेही औरंगाबाद, नाशिक, जळगाव असे स्वतःचे गड राखण्यात […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : अखेरीस राज्यातील सर्व जिल्ह्यांना हक्काचे पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री उशिरा पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. यात भाजपकडे 21 तर शिंदे गटाकडे 15 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय शिंदे गटानेही औरंगाबाद, नाशिक, जळगाव असे स्वतःचे गड राखण्यात यश मिळविले आहे.

हे वाचलं का?

या पालकमंत्रीपदाच्या यादीवर नजर टाकल्यास सिंधुदुर्गबाबत आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो. सिंधुदुर्गमधून आमदार असलेल्या आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर आणि मुंबईचे पालकमंत्री म्हणून संधी देत शिंदे-फडणवीसांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचवेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यातून आमदार असलेल्या रविंद्र चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, यातून शिंदे-फडणवीस यांनी सिंधुदुर्गमध्ये भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दीपक केसरकरांमधील वाद टाळल्याचे बोलले जात आहे.

राणे-केसरकर वाद सिंधुदुर्गला नवीन नाही. सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष असल्यापासून केसरकर आणि राणे यांच्यात राजकीय वैर होते. त्यानंतर 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेल्या केसरकर आणि राणेंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समेट घडवून आणला. त्यामुळे केसरकरांचा विधानसभेतील पहिला विजय सुकर झाला. 2014 साली केसरकरांनी शिवसेनेत उडी घेतली आणि या वादाला आणखी खतपाणी मिळाले.

यापूर्वी केसरकरांनी राजकीय दहशतवाद असे म्हणत कायमच राणे यांना लक्ष्य केलेले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राणेंच्या विरोधात केसरकर यांनी चांगलेच वातावरण तापवले. राणेंनी दहशतवाद निर्माण केल्याचा मुद्दा कायम प्रचारात ठेवला आणि याचा फटका बसून राणेंचा पराभव झाला. या पराभवाचे शल्य आजही राणे अनेकदा जाहीररित्या बोलून दाखवितात. अलिकडेच शिंदे-भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतरही केसरकर-राणे वाद महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर राणेंवर टीका करणार नाही, अशी भूमिका केसरकरांनी घेतली.

सिंधुदुर्ग भाजपला देऊन रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेने घेतलं?

यापूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद फडणवीस आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेकडे होते. तर रायगडचे पालकमंत्रीपद आधी भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. फडणवीस सरकारमध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून केसरकर आणि नंतर उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी होती. .

तर रायगडचे पालकमंत्रीपदी आधी प्रकाश मेहता नंतर रविंद्र चव्हाण आणि मविआ काळात आदिती तटकरे होत्या. आता नवीन यादीत सिंधुदुर्ग भाजपकडे गेले असून रायगड शिवसेनेकडे गेले आहे. सिंधुदुर्गची जबाबदारी ठाण्याचे भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना देण्यात आली आहे. तर रायगडची जबाबदारी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे.

    follow whatsapp