दिशा सालियन : राणेंच्या अडचणी वाढणार?; महिला आयोग ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये, पोलिसांना दिले आदेश

मुंबई तक

• 12:39 PM • 21 Feb 2022

दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोपामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाने मालवण पोलिसांना आदेश दिले असून, ४८ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनबद्दल गंभीर आरोप केले आहेत. […]

Mumbaitak
follow google news

दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोपामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाने मालवण पोलिसांना आदेश दिले असून, ४८ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

हे वाचलं का?

दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनबद्दल गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी केलेल्या आरोपांवर नाराजी व्यक्त मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिलेलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महिला आयोगाने मालवण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ४८ तासांमध्ये यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी पत्रात काय म्हटलंय?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाला दिलेल्या तक्रारीत त्याचं म्हणणं मांडलं आहे. “दिशा सालियन ही सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होती. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झालेला नसून, त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असं तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असं असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान हिची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी,” अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केलेली आहे.

नारायण राणेंनी नेमकं काय विधान केलेलं?

१९ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला पार्टीला बोलावलं होतं. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षा रक्षक होते? ८ जून रोजी दिशा सालियन हिची बलात्कार करून हत्या झाली. ही गोष्ट सुशांत सिंह याला समजली. सुशांत सिंह राजपूतने याबद्दल आवाज उठवायचा निर्णय घेतला. त्यामुळे सुशांत सिंह यालाही त्याच्या घरी जाऊन ठार मारण्यात आलं”, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केलेला आहे.

    follow whatsapp