महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, मुक्काम पोस्ट ‘ठाणे’!, असा आहे एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास

मुंबई तक

• 01:02 PM • 30 Jun 2022

महाराष्ट्रात २१ जून रोजी राजकीय भूकंप झाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेत सुरत गाठलं. त्यानंतर सुरतहून हे सगळे आमदार गुवाहाटीला गेले. २१ जूनपासून राज्यात सत्तानाट्याचा खेळ चांगलाच रंगला होता. त्याच शेवट काय होणार आणि क्लायमॅक्स काय असणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. सत्तानाट्याचा शेवट झाला तो अपेक्षित होता. बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात २१ जून रोजी राजकीय भूकंप झाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेत सुरत गाठलं. त्यानंतर सुरतहून हे सगळे आमदार गुवाहाटीला गेले. २१ जूनपासून राज्यात सत्तानाट्याचा खेळ चांगलाच रंगला होता. त्याच शेवट काय होणार आणि क्लायमॅक्स काय असणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. सत्तानाट्याचा शेवट झाला तो अपेक्षित होता.

हे वाचलं का?

बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या साथीने मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. उद्धव ठाकरेंनीही मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं तरीही आलो होतो असं म्हणत जाता फडणवीसांना टोला लगावला. अशात देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारत एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं. हाच या राजकीय नाट्याचा क्लायमॅक्स ठरला.

देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा करत असताना हेदेखील जाहीर केलं की ते स्वतः मंत्रिमंडळात नसतील. मात्र बाहेर राहून हे सरकार व्यवस्थित कसं चालेल याच्यावर लक्ष ठेवून असतील. बाळासाहेब ठाकरेंचं सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं असंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही खेळी खूप मोठी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा जो नवा अध्याय लिहिला जातो आहे त्याची चर्चा पुढच्या अनेक वर्षांपर्यंत होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांची कारकीर्द रिक्षावाला म्हणून सुरू केली होती. त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे वाचा सविस्तर.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या (Eknath Shinde) जीवनाबद्दल महत्वपूर्ण माहिती

एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६४ सालचा. सातारा हे त्यांचं जन्मस्थान. मात्र बाल वयातच त्यांनी गाव सोडलं आणि ठाण्यात स्थायिक झाले. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या एकनाथ यांनी ठाण्यातील मंगल हायस्कूल शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर न्यू इंग्लिश हायस्कूलमधून अकरावी केली. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

सुरुवातीला चालवली रिक्षा

दरम्यान, सुरुवातीला त्यांनी ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केले. मात्र नोकरीत ते फार वेळ रमले नाहीत. म्हणून त्यांनी ठाण्यात ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला.

आनंद दिघेंनी दिला पाठिंबा

ऑटो रिक्षा चालवत असतानाच त्यांना राजकीय दृष्टी मिळाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे या दोन व्यक्तींनी त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या काळात त्यांना आनंद दिघे यांचा चांगला सहवास लाभला. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या मनात विश्वास निर्माण केला. आपल्या कामामुळे आणि कामाच्या पद्धतीमुळे एकनाथ शिंदे सर्वपरिचित झाले. म्हणूनच एकनाथ शिंदे यांना वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी म्हणजेच १९८४ साली त्यांना किसन नगर येथील शाखाध्यक्ष पद दिले. आजही किसन नगरमध्ये एकनाथ शिंदे यांचे खूप समर्थक आहेत. एकनाथ शिंदेही या विभागातील अनेक लोकांना वैयक्तिक ओळखत असल्याने त्यांचा इथे आजही चांगलाच दबदबा आहे.

… असे ते झाले ते नगरसेवक

शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थित सांभाळल्याने आनंद दिघे यांनी त्यांना थेट नगरसेवकाचं तिकीट दिलं. १९९७ साली ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००१ साली त्यांना ठाणे महापालिकेचं सभागृह नेतेपद मिळाले. ते जवळपास २००४ पर्यंत नगरसेवक पदी होते. त्यांचं कार्य आणि पक्षनिष्ठा पाहून त्यांना आमदारकीचंही तिकीट मिळालं. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. मात्र एकनाथ शिंदे जिंकून आले होते. तर २००५ साली ते ठाणे जिल्हा प्रमुख झाले. २००४ पासून ते आजतागायत शिंदे ठाण्याचे आमदार राहिले आहेत.

मधल्या काळात शिवसेनेवर अनेक संकटे आली. २५ वर्षांची भाजप – शिवसेना युती तुटली. स्वबळावर निवडणुका झाल्या. या सर्व अडचणींच्या काळात एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे होते.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेची फसवणूक झाली असा दावा करण्यात येतो. या काळातही इतर पक्षांना हाताशी घेऊन सत्ता स्थापन करताना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी, मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावे चर्चेत होती. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या काळात एकनाथ शिंदे या निर्णयावरून नाराज असल्याच्या चर्चाही उठल्या होत्या. मात्र या चर्चा पेल्यातील वादळप्रमाणे शमल्या. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले नाही यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये आजही नाराजी आहे. हीच नाराजी आजच्या बंडखोरीतून बाहेर आली असल्याचंही म्हटलं जातंय.

एकनाथ शिंदे यांच्यावर कोसळला होता दुःखाचा डोंगर

एकनाथ शिंदे आणि लता शिंदे या जोडप्याला तीन मुले होती. दिपेश, शुभदा आणि श्रीकांत. एका अपघातात दिपेश आणि शुभदा यांचा मृत्यू झाला. आपल्या चिमुकल्या मुलांना मुखाग्नी देण्याची वेळी एकनाथ शिंदे यांच्यावर आली. २००० साली हा भयंकर अपघात घडला होता. या अपघातानंतर एकनाथ शिंदे बरेच खचले होते. मात्र आनंद दिघे यांनीच त्यांना या दुःख प्रसंगातून बाहेर काढले. त्यांचा लहान मुलगा श्रीकांत शिंदे हे आज लोकसभेत खासदार

एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेना नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

आनंद दिघे यांच्या आकस्मिक निधनानंतर शिंदे यांना राजकीय वारसा मिळाला

26 ऑगस्ट 2001 रोजी अचानक दिघे यांचे अपघाती निधन झाले. त्याच्या मृत्यूला आजही अनेकजण हत्या मानतात. नुकताच दिघे यांच्या मृत्यूवर मराठीत धर्मवीर नावाचा चित्रपटही आला आहे. दिघे यांना धर्मवीर म्हणूनही ओळखले जात होते.

दिघे यांच्या निधनानंतर शिवसेनेला ठाण्यातील वर्चस्व राखण्यासाठी एका चेहऱ्याची गरज होती. ठाकरे कुटुंबाला निवांत वृत्तीने ठाणे सोडता आले नाही. त्याचं कारण म्हणजे ठाणे हा महाराष्ट्रातील मोठा जिल्हा आहे. शिंदे यांचा सुरुवातीपासूनच दिघे यांच्याशी संबंध असल्याने त्यांचा राजकीय वारसा शिंदे यांना मिळाला.

जनतेचे नेते बनले एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला तो आनंद दिघे यांच्यामुळेच. दिघेंनी 1984 मध्ये मध्ये शिंदे यांची किसन नगरच्या शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्या नंतर दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गरजवंतांना स्वस्तात धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी केलेले आंदोलन, टंचाईच्या काळात नागरिकांना पामतेल उपलब्ध करुन देणे, नागरीकांच्या समस्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केल्याने शिंदे जनतेचे नेते बनले.

सीमाप्रश्नावरुन भोगला तुरुंगवास

अनेक आक्रमक आंदोलनामुळे शिंदे यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. एवढेच नाही तर 1986 मध्ये सीमाप्रश्नावरुन झालेल्या आंदोलनात शिंदे यांनी आक्रमक पणे भाग घेतला होता. या आंदोलनामुळे शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शिंदे यांनी बेल्लारी तुरुंगात 40 दिवसांचा कारावास भोगला होता.

आता हेच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांचं आणि अपक्ष आमदारांचं बळ त्यांच्यासोबत आहे. तसंच भाजपने त्यांना पाठिंबा दिला आहे.

    follow whatsapp