गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर दोन नवीन मेट्रो सेवा मुंबईकरांच्या भेटीला

मुंबई तक

• 01:00 PM • 31 Mar 2022

२०१४ साली घाटकोपर ते वर्सोवा या भागात मुंबईत पहिली मेट्रो सेवा सुरु झाली. या मार्गावर ट्रॅफिकमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब होती. यानंतर मुंबई शहरासाठी मेट्रो प्रकल्पांचं विस्तारीकरणाच्या घोषणा झाल्या. परंतू प्रत्यक्षात या नवीन सेवा मुंबईकरांसाठी सुरु होण्याकरता ७ वर्षांचा कालावधी जावा लागला आहे. MMRDA चे आयुक्त एस.व्ही.ए. श्रीनिवास यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर Metro 2 […]

Mumbaitak
follow google news

२०१४ साली घाटकोपर ते वर्सोवा या भागात मुंबईत पहिली मेट्रो सेवा सुरु झाली. या मार्गावर ट्रॅफिकमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब होती. यानंतर मुंबई शहरासाठी मेट्रो प्रकल्पांचं विस्तारीकरणाच्या घोषणा झाल्या. परंतू प्रत्यक्षात या नवीन सेवा मुंबईकरांसाठी सुरु होण्याकरता ७ वर्षांचा कालावधी जावा लागला आहे. MMRDA चे आयुक्त एस.व्ही.ए. श्रीनिवास यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर Metro 2 A आणि Metro 7 हे दोन प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार असल्याची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ एप्रिलला या नवीन मार्गांचं उद्घाटन होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर राज्य सरकार मुंबईकरांना हे नवीन गिफ्ट देणार असल्याचं आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितलं. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्याचंही श्रीनिवास यांनी स्पष्ट केलं.

Metro 2 A हा मार्ग दहीसर ते डी.एस.नगर आणि Metro 7 हा मार्ग दहीसर पूर्व ते अंधेरी पूर्व या भागातून जाणार आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या दोन्ही बाजूंना जोडले जाणार आहेत. या मार्गावर धावणारी मेट्रो रेल्वे ही चालकाशिवाय धावणार आहे. Communication based train control (CBTC) या अद्ययावत सिग्नलिंग सिस्टीमवर या मेट्रो ट्रेन धावणार आहेत. परंतू सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या मेट्रो गाड्यांमध्ये चालक असणार आहेत असं आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितलं.

पहिल्या तीन किलोमीटरसाठी या दोन्ही मार्गांवर तिकीटाचे दर हे सर्वसामान्य मुंबईकरांना परवडतील असे ठेवण्यात आल्याचंही श्रीनिवास यांनी सांगितलं. पहिल्या तीन किलोमीटरच्या टप्प्यासाठी या मार्गावरचे तिकीट दर हे १० रुपये तर त्यापुढील टप्प्याकरता ५० रुपये इतके निश्चीत करण्यात आले आहेत. प्रत्येक दिवशी या मार्गावरुन सुमारे साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतील असा विश्वास श्रीनिवास यांनी व्यक्त केला आहे.

जाणून घ्या, काय आहेत या नवीन मेट्रो सेवेची वैशिष्ट्य?

१) २०.७३ किलोमीटरचा टप्पा यातून पूर्ण केला जाईल, ज्यात ६ डब्यांच्या ११ मेट्रो ट्रेन्स धावतील.

२) या मेट्रो रेल्वेची प्रवासी क्षमता २२८० प्रवासी इतकी असून प्रत्येक डब्यात ५० प्रवासी बसून प्रवास करु शकणार आहेत.

३) सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत ही सेवा प्रवाशांकरता सुरु राहील.

४) प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकरता प्रथमोपचार सेवा उपलब्ध असणार आहे.

५) प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. ज्यात प्रवाशांच्या बॅग मेटल डिटेक्टरद्वारे तपासल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक रेल्वे स्थानकावर श्वानपथकही तैनात असणार आहे.

६) महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक तैनात असणार आहे. तसेच सर्व ठिकाणी महिला प्रवाशांना कामी येतील असे हेल्पलाईन नंबरही लावण्यात येणार आहेत.

७) प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. जास्तीची गर्दी, बेवारस वस्तू, प्रवासी धोक्याचं पिवळं निशाण ओलांडत तर नाही ना याच्यावर सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवली जाईल.

८) QR Ticket, Mobile OQ Ticket, EVM Contactless Card असे सर्व अद्ययावत पर्याय प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

    follow whatsapp