Jitendra Awhad: विनयभंगाचा गुन्हा माझ्यावर दाखल करणं हा राजकीय षडयंत्राचाच भाग

मुंबई तक

• 09:45 AM • 14 Nov 2022

विनयभंगाचा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करणं हा राजकीय षडयंत्राचाच भाग आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. मी देखील राज्याचा मंत्री होतो त्यावेळी मी अशा प्रकारचं राजकारण केलं नाही. परवाही असंच मला पोलीस स्टेशनला बोलावलं. गप्पा मारल्या गेल्या, त्यानंतर मी म्हटलं चला मी निघतो मला मुंबईला जायचं आहे त्यावेळी डीसीपी तिकडे आले आणि म्हणाले की […]

Mumbaitak
follow google news

विनयभंगाचा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करणं हा राजकीय षडयंत्राचाच भाग आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. मी देखील राज्याचा मंत्री होतो त्यावेळी मी अशा प्रकारचं राजकारण केलं नाही. परवाही असंच मला पोलीस स्टेशनला बोलावलं. गप्पा मारल्या गेल्या, त्यानंतर मी म्हटलं चला मी निघतो मला मुंबईला जायचं आहे त्यावेळी डीसीपी तिकडे आले आणि म्हणाले की आम्ही तुम्हाला अटक केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र केलं गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

हर हर महादेवच्या वेळीही चुकीच्या पद्धतीने अटक

अटक करण्याआधी नोटीस द्यावी लागते. मी हर हर महादेव सिनेमाला विरोध केला म्हणून अटक केली. मी त्यादिवशी पत्रकार परिषदही घेतली नाही. १९३२ चं कुठलं तरी कलम लावून मला अटक केली होती. ओढून ताणून सगळा प्रकार केला गेला. लोकांनी सांगितलं की जितेंद्र आव्हाड आलेही नाहीत तरीही मला अटक झाली होती. आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटा गुन्हा दाखल केला आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्देश या लोकांनी वाचले आहेत का? असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला.

ऱाजकारणाची पातळी खालवली आहे

आज माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण चाललं आहे. माझ्या मुलीला आज तिच्या मैत्रिणीने विचारलं की तुझ्या वडिलांनी कुणाचा विनयभंग केला आहे का? हे किती भयंकर आहे. मला असल्या राजकारणात राहायचं नाही. मी गेली ३५ वर्षे राजकारणात शरद पवार यांच्यासोबत आहे पण इतक्या खालच्या पातळीवर कधीही झालेलं नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

माझ्या खुनाचं षडयंत्र रचलं असतं तरीही चाललं असतं

माझ्या विरोधात कुणी षडयंत्र केलं त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. मला फक्त वाईट वाटतं आहे ते ३५४ कलम. षडयंत्र माझ्या खुनाचंही रचलं गेलं होतं. ३५४ मला मनाला लागलं आहे. खोटं कलम लावून षडयंत्र केलं गेलं आहे. आज मी राजीनामा आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. अध्यक्ष शरद पवार यांनाच मी लिहिलं आहे. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण असेल तर मला राजकारणात पडायचं नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp