FoxConn चा प्रकल्प शिंदे-फडणवीसांमुळे गुजरातला? उदय सामंत म्हणाले…

मुंबई तक

• 02:50 PM • 13 Sep 2022

भविष्यातील औद्योगिक विकासात आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे असा आरोप होतो […]

Mumbaitak
follow google news

भविष्यातील औद्योगिक विकासात आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे असा आरोप होतो आहे. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई तकशी बोलताना याचं उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

उदय सामंत यांनी फॉक्सकॉन वेदांताबाबत काय म्हटलं आहे?

फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातच येणार हे मागच्या दोन महिन्यात नक्की झालेलं नव्हतं. त्यांनी गुजरातकडे प्रस्ताव दिला होता, इतर राज्यांकडेही प्रस्ताव दिला होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सुरूवात ही काही दोन महिन्यांपूर्वी झालेली नाही ती एक वर्षापूर्वी झाली आहे. विरोधक जो उल्लेख करत आहेत त्या बैठका मागच्या दोन महिन्यात झाल्या. चांगलं पॅकेज कसं देता येईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. वर्षभरात ज्या चर्चा होणं अपेक्षित होती ती झाली नव्हती. यात मी राजकारण आणत नाही.

जर बैठका वेळेवर झाल्या असत्या तर प्रकल्प महाराष्ट्रात आला असता. चांगलं झालं तर आमच्यामुळे झालं आणि वाईट झालं तर ते सरकारमुळे झालं असं जे काही पसरवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत ते योग्य नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ही बातमी आल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. प्रकल्प तिकडे गेला आहे पण वेळ पडल्यास आम्ही अग्रवाल यांच्याशी चर्चा करणार आहोत. वेळ आल्यास आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही चर्चा करणार आहोत.

वेदांताला मागच्या वर्षात वेळ मिळाला का?

जे राजकारण करत आहेत त्यात मी हे विचारू इच्छितो की फॉक्सकॉन वेदांताला जो वेळ मिळणं अपेक्षित होतं तो दिला गेला का? मागच्या वर्षभरात ते झालं नाही. तसंच त्यांना जे इन्सेटिव्ह पॅकेज देणं अपेक्षित होतं त्यावरही ठोस म्हणावी अशी चर्चा आधीच्या सरकारच्या कालावधीत झाली नाही. कुठलाही उद्योजक हा वर्षभर थांबू शकत नाही. आत्ता जे राजकारण केलं जातं आहे ते योग्य नाही. राजकीय रंग या प्रकरणाला देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. पुन्हा महाराष्ट्रात प्रकल्प येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार?

महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला आणि तशी घोषणा झालेला फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर याला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरलं जात आहे. त्याचबरोबर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार असल्याचं आता विरोधकांनी म्हटलं आहे.

मोदी सरकार जबाबदार; माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई काय म्हणाले?

“एखादा उद्योग येतो. एखादा उद्योग येत नाही, इथंपर्यंत ठिक आहे, पण हा उद्योग महाराष्ट्राच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता. या उद्योगामुळे इतर उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असती. त्यांच्या अनुषंगानं अनेक कंपन्यांची साखळी तयार झाली असती. सेमीकंडक्टर निर्मिती ज्याची आज जगाला गरज आहे. महाराष्ट्राने यात मोठं योगदान दिलं असतं. असे किती उद्योग केंद्र सरकार… कारण मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत केंद्राचा शब्द महत्त्वाचा ठरतो. तिथे केंद्र सरकार समर्थ असल्यामुळे किती उद्योग महाराष्ट्रातून गुजरातकडे जातील, हे बघत राहण्याची पाळी महाराष्ट्रावर आलीये का असा प्रश्न निर्माण होतो”, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत.

    follow whatsapp