दिव्यांची आरास करा, फटाके फोडणे टाळा! दिवाळीसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई तक

• 02:23 PM • 27 Oct 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी साजरी होते आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही दिवाळी साजरी करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काही वेळापूर्वीच सरकारने पत्रक काढून दिवाळी कशी साजरी करावी याबाबत सूचना दिल्या आहेत. आत्तापर्यंत आलेले सण ज्या प्रमाणे साधेपणाने साजरे करण्यात आले, त्याचप्रमाणे दिवाळीही साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. कोरोना प्रतिबंधाचे […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी साजरी होते आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही दिवाळी साजरी करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काही वेळापूर्वीच सरकारने पत्रक काढून दिवाळी कशी साजरी करावी याबाबत सूचना दिल्या आहेत. आत्तापर्यंत आलेले सण ज्या प्रमाणे साधेपणाने साजरे करण्यात आले, त्याचप्रमाणे दिवाळीही साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आणि गर्दी टाळण्याचंही आवाहन सरकारने केलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे नवी नियमावली आपण जाणून घेऊ

1) कोव्हिड संसर्गामुळे राज्यातील बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळं नवरात्रापासून सुरू करण्यात आली आहेत. दिपावली उत्सवाच्या दरम्यान या ठिकाणी गर्दी करू नये. दिवाळीचा उत्सव घरच्या घरी साधेपणाने साजरा करावा

2) दीपावली उत्सवाच्या दरम्यान कपडे, फटाके, दागिने आणि इतर अनेक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये आणि रस्त्यांवर गर्दी होत असते. ही गर्दी करणं लोकांनी टाळावं. खासकरून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. जे बाहेर जात आहेत त्यांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे.

3) दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. या उत्सवादरम्यान फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येते. यामुळे ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. प्रदुषणाचा परीणाम दिवाळीनंतर दीर्घकाळ दिसून येतो. त्यामुळे दिवाळीत फटाके फोडणं टाळावं त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.

5) कोरोनामधील निर्बंध शिथील करण्यात आले असले तरीही ब्रेक द चेनचे सगळे नियम पाळण्यात यावेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याचं टाळावं. दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करत असताना नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे.

6) सांस्कृतिक कार्यक्रमांच्याऐवजी आरोग्य विषयक शिबीरं जसं की रक्तदान शिबीरं आयोजित करण्यास प्राधान्य द्यावं. कोरोना, मलेरिया, डेंग्यू या आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

7) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचं तंतोतंत पालन केलं गेलं पाहिजे.

8) कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिका, पोलीस, प्रशासन या सगळ्यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचं अनुपालन करणं बंधनकारक असणार आहे. काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्या असतील तर त्याचेही पालन करावं लागणार आहे.

    follow whatsapp