मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील १४० वर्षपूर्वीचा जुना केबल पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली. रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुमारे 400 जण नदीत पडल्याची माहिती आहे. यातील काही लोकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत प्रशासनाच्यावतीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT
दुर्घटनेनंतर लोकांना नदीपात्राबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबतच स्थानिक नागरिक देखील बचावकार्यात उतरले आहेत. दुर्घटनेनंतरचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यात लोक बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहेत.
दरम्यान, दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांना स्वतः परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास, बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री पटेल यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मोरबीचा पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले. 1880 मध्ये सुमारे 3.5 लाख खर्चून हा पूल पूर्ण झाला होता. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते.
अनेक वर्षांचा हा पूल असल्याने मागील ६ महिन्यांपासून तो नुतनीकरणासाठी सामान्य लोकांना बंद ठेवण्यात आला होता. मात्र याच महिन्यातील 25 ऑक्टोबर रोजी हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. आज रविवार असल्यामुळे पूलावर प्रचंड गर्दी होती. सेल्फी काढण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासमवेत पूलावर आले असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
