हौसाबाई पाटील यांनी सांगितल्या होत्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी

मुंबई तक

• 01:45 AM • 24 Sep 2021

क्रांती सिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांचं निधन झालं आहे.वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मात्र 2018 मध्ये त्यांनी आज तकशी चर्चा करताना स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी सांगितल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हौसा पाटील […]

Mumbaitak
follow google news

क्रांती सिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांचं निधन झालं आहे.वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मात्र 2018 मध्ये त्यांनी आज तकशी चर्चा करताना स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी सांगितल्या.

हे वाचलं का?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हौसा पाटील समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी झटत राहिल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हौसाताई पाटील काही काळ समाजकारण व राजकारणातही सहभाग घेतला. पुरोगामी चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून हौसाताई पाटील यांची ओळख होती. सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहत होत्या.

काय सांगितलं होतं हौसाताईंनी आज तकला?

आम्ही जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढा देण्यास सुरूवात केली तेव्हा सांगली हा जिल्हा नव्हता. तेव्हा सातारा हाच जिल्हा होता. आज ज्याला सांगली म्हटलं जातं त्याला त्या काळी दक्षिण सातारा म्हटलं जात होतं. आम्ही आमच्या काही सहकाऱ्यांसह मिळून इंग्रजांचे शस्त्र लुटली होती. त्यांचा आधार घेऊन आमचे जे सहकारी तुरुंगात गेले आहेत आम्ही त्यांना सोडवत असू.

एक दिवस मी माझ्या पतीने भवानी नगर पोलीस ठाण्याच्या समोर नाटक केलं की माझे पती मला मारत आहेत. तसंच जबरदस्तीने सासरी घेऊन जात आहेत. त्यावेळी माझ्या पतीने मला खूप मारलं असं करणं आवश्यक होतं कारण आमचा हंगामा पाहून पोलीस आमच्या जवळ यावेत असं आम्हाला वाटत होतं. तसंच घडलं आम्ही करत असलेला तमाशा पाहून पोलीस तिथे आले. त्याच वेळी इतर सहकारी पोलीस स्टेशनमध्ये शिरले तिथे असलेल्या बंदुका, दारू-गोळा, काडतुसं घेऊन तिथून पळाले. आम्ही नाटक इतकं छान वठवलं होतं की दोन इंग्रज शिपाई आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला आले होते. ते जेव्हा परत गेलं तेव्हा त्यांना कळलं की स्वातंत्र्य सैनिकांनी पोलीस ठाणं लुटलं आहे. कारण पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र, दारूगोळा, काडतुसं काहीही नव्हतं.

आणखी एक किस्सा त्यांनी सांगितला तो गोव्याचा आहे. गोवा तुरुंगातून आम्ही आमचा एक सहकारी बाळ जोशी यांना सोडवलं होतं. त्यावेळी माझा मोठा मुलगा फक्त दोन महिन्यांचा होता. त्याला ताप आला होता. मी त्याला त्याच्या आत्याकडे सोपवलं आणि माझा मावस भाऊ जी. डी. बापू लाड यांच्यासह गोव्याला गेले. त्यावेळी एक चिठ्ठी मी माझ्या केसांमध्ये लपवली होती. त्यामध्ये आमच्या सहकाऱ्याला सोडवल्यावर त्याला कुठून कसं घेऊन जायचं ते लिहिलं होतं. आम्ही आमच्या सहकाऱ्याला सोडवलं. मांडवी नदी आम्ही पोहून पार केली. त्यानंतर जंगलातील पायवाट तुडवत आठ दिवसांनी घरी पोहचलो. अशी आठवणही हौसा पाटील यांनी आज तकला सांगितली होती.

    follow whatsapp