‘…अन् तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली’; मराठा आरक्षण आंदोलकांबद्दल बोलताना तानाजी सावंतांचा तोल सुटला

मुंबई तक

25 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:48 AM)

मागच्या काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. ते नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत आहेत. आता त्यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असं वादग्रस्त वक्तव्य […]

Mumbaitak
follow google news

मागच्या काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. ते नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत आहेत. आता त्यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मेळाव्यात बोल्ट होते. सध्या त्यांच्या या विधानाची चर्चा जोरदार सुरु आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले तानाजी सावंत?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्यांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली, असं सावंत म्हणाले. युती सरकार असताना आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्याला मुका मोर्चा म्हणून हिणवलं, मराठ्यांचा अपमान केला, आम्ही गप्प राहिलो. पण 2017-2018 मध्ये त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं. दोन बॅच निघाले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या, असं सावंत म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार येताच आरक्षण गेलं : तानाजी सावंत

2019 साली ज्यावेळेस तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यात आरक्षण गेलं. आम्हा मराठ्यांना काही कळत नाही का? तेव्हा काही आंदोलन वगैरे झालं नाही. सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, अशा शब्दात तानाजी सावंतांनी वादग्रस्त विधान केलं. पुढं बोलताना ते म्हणाले, बघा डोकं कसं चालवलं जातं आज ओबीसींमधून आरक्षणाची मागणी केली, पुढच्या दोन महिन्याने एससी प्रवर्गातून मागणी करतील. याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे, असं सावंत म्हणाले.

2024 पर्यंत आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही

माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळायलाच पाहिजे. आम्ही सोडणार नाही घेतल्याशिवाय. ज्या समाजात मी जन्म घेतला त्या समाजासाठी सत्ता सोडायची वेळ आली तरी सोडेन, असं तानाजी सावंत म्हणाले. माझे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे या 2024 च्या आतमध्ये आपल्याला पाहिजे तसं आरक्षण, टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं वचन तानाजी सावंतांनी दिलं.

कळंब शहरातून निघाला होता दुसऱ्या पर्वातील राज्यातील पहिला मोर्चा

2016 सालापासून आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोर्च्याची हाक देण्यात आली होती. जवळपास राज्यात लाखोंच्या संख्येत 58 मूक मोर्चे निघाले होते. त्यानंतर युती सरकारने 2018 साली मराठा समाजाला आरक्षण दिल होतं. त्यांनतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरक्षणाला स्थगिती मिळाली होती. त्यांनतर कोणतेही मोर्चे, आंदोलने झाले नाही. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन देखील होते. मात्र नंतर शिंदेचं बंड झालं आणि सत्तांतर झालं. सत्तांतरानंतर आरक्षणासाठी राज्यातील पहिला मोर्चा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरातून निघाला होता. आता त्यात जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता यावर विरोधकांच्या काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं गरजेचं आहे.

    follow whatsapp