Johnny depp vs Amber Heard : ‘त्या’ एका लेखामुळे एंबर हर्डला द्यावे लागणार १५ मिलियन डॉलर

मुंबई तक

• 09:39 AM • 02 Jun 2022

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री एंबर हर्ड यांच्यातील मानहानी प्रकरणाचा निकाल अखेर आला. एंबर हर्ड विरोधातील या प्रकरणात न्यायालयाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने या मानहानीच्या प्रकरणात आता अभिनेत्री एंबर हर्डला १५ मिलियन डॉलरची भरपाई जॉनी डेपला देण्याचे आदेश दिले. एंबर हर्डला यातील १० मिलियन डॉलर भरपाई म्हणून, तर ५ मिलियन […]

Mumbaitak
follow google news

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री एंबर हर्ड यांच्यातील मानहानी प्रकरणाचा निकाल अखेर आला. एंबर हर्ड विरोधातील या प्रकरणात न्यायालयाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला.

हे वाचलं का?

न्यायालयाने या मानहानीच्या प्रकरणात आता अभिनेत्री एंबर हर्डला १५ मिलियन डॉलरची भरपाई जॉनी डेपला देण्याचे आदेश दिले. एंबर हर्डला यातील १० मिलियन डॉलर भरपाई म्हणून, तर ५ मिलियन डॉलर दंड म्हणून द्यावे लागणार आहेत.

दुसरीकडे एंबर हर्डने दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यांपैकी दोन दाव्यांमध्ये जॉनी डेपने कोणतीही मानहानी केली नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. तर तिसऱ्या प्रकरणात मात्र जॉनी डेपने एंबर हर्डची मानहानी केली असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. या प्रकरणात न्यायालयाने जॉनी डेपला अभिनेत्री एंबर हर्डला २ मिलियन डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाच्या निर्णयावर अभिनेत्री एंबर हर्डने प्रतिक्रिया व्यक्त केली. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर एंबर हर्ड म्हणाली, “मी माझी नाराजी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. माझं मन दुभंगलं आहे. डोंगराइतके पुरावेही माझ्या पूर्व पतीच्या ताकद आणि प्रभावासमोर टिकू शकले नाहीत. मी यामुळेही निराश आहे की, या निर्णयाचा परिणाम इतर महिलांवरही होईल. हे एका धक्क्यासारखंच आहे. महिलांवरील हिंसा गांभीर्याने घेण्याबद्दल हा एक धक्का आहे.”

न्यायालयाच्या निर्णयावर जॉनी डेप म्हणाला, या प्रकरणाचा उद्देश सत्य समोर आणणं हा होता. मग परिणाम काहीही असो. सत्याला कधीही मिटवलं जाऊ शकत नाही, असं त्याने सुरुवातीला म्हटलं होतं.

त्यानंतर जॉनी डेपने निवेदन प्रसिद्ध केलं आणि न्यायालयाचे आभार मानले. मागील सहा वर्षापासून माझं आयुष्य, माझं सर्वकाही असलेल्या माझ्या मुलांचं आणि माझ्या जवळच्या लोकांचं, जे मला अनेक वर्षांपासून समर्थन करत आलेत, त्यांचं आयुष्य बदलू गेलं होतं, असं जॉनी डेपने म्हटलंय.

माध्यमांच्या माध्यमातून माझ्यावर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप लादण्यात गेले. याचा माझं आयुष्य आणि करिअर परिणाम झाला. सहा वर्षानंतर न्यायाधीशांनी माझं आयुष्य मला परत मिळवून दिलंय. सुरूवातीपासूनच मानहानीच्या या प्रकरणाचा उद्देश सत्य सर्वांसमोर आणणं होता, असंही त्याने म्हटलेलं आहे.

जॉनी डेप आणि एंबर हर्डचं प्रकरण काय?

५८ वर्षीय अभिनेता जॉनी डेपने त्याची पूर्वीची पत्नी आणि अभिनेत्री ३६ वर्षीय एंबर हर्ड विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. वर्तमान पत्रातील एका लेखावरून हा दावा दाखल करण्यात आला होता.

एंबर हर्डने २०१८ मध्ये वॉशिग्टन पोस्ट या वर्तमानपत्रात एक दीर्घ लेख लिहिला होता. मी कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरले आहे, अशा आशयाच्या या लेखात एंबर हर्डनं कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं.

याच लेखावर अभिनेता जॉनी डेपने आक्षेप घेतला होता. हा लेख माझी बदनामी करणारा असून, यामुळे माझ्या करिअरवर परिणाम झालाय, असं तो म्हणाला होता. त्यानंतर जॉनी डेपने एंबर हर्ड विरुद्ध ५० मिलियन डॉलरचा दावा दाखल केला होता.

जॉनी डेपने मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर एंबर हर्डने त्याच्या विरोधात १०० मिलियन डॉलरचा दावा केला होता. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने बुधवारी दिला. एंबर हर्डच्या लेखामुळे जॉनी डेपची बदनामी झाली असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.

एंबरने लिहिलेला लेख असत्य आणि मानहानी करणारा आहे, असं न्यायालयाने म्हटलंय. अभिनेत्री एंबर हर्डने तिच्या लग्नाबद्दल जी विधानं केली, ती खोटी होती, असंही न्यायालयाने म्हटलंय.

जॉनी डेप-एंबर हर्डच्या प्रकरणाकडे सगळ्यांचं लागलं होतं लक्ष

जॉनी डेप विरुद्ध अभिनेत्री एंबर हर्ड या प्रकरणाची सुरूवातीपासून चर्चा होती. सुनावणीच्या काळात लोकांचा या प्रकरणाबद्दल रस वाढल्याचंही दिसून आलं. या प्रकरणाची सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर झाली. ज्यात पाच पुरुष आणि दोन महिला न्यायाधीश यांचा समावेश होता.

    follow whatsapp