अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, काय आहे सुसाईड नोटमध्ये?

मुंबई तक

• 04:44 PM • 20 Sep 2021

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. प्रयागराज पोलिसांनी हा दावा केला आहे की नरेंद्र गिरी महाराजांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांच्या दाव्यानुसार एक सुसाईड नोटही त्यांना घटनास्थळी मिळाली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. हरिद्वारमधून आनंद गिरी यांनाही ताब्यात घेण्यात […]

Mumbaitak
follow google news

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. प्रयागराज पोलिसांनी हा दावा केला आहे की नरेंद्र गिरी महाराजांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांच्या दाव्यानुसार एक सुसाईड नोटही त्यांना घटनास्थळी मिळाली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. हरिद्वारमधून आनंद गिरी यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद गिरी यांचं नाव सुसाईड नोटमध्ये आहे.

हे वाचलं का?

काय आहे कथित सुसाईडनोटमध्ये?

प्रयागराज पोलिसांनी हा दावा केला आहे की महंत नरेंद्र गिरी महाराजांच्या खोलीतून जी सुसाईड नोट मिळाली त्यामध्ये त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यासहीत काही इतर नावं आहेत. एवढंच नाही तर यामध्ये असं लिहिलं गेलं आहे की नरेंद्र गिरी का दुःखी होते? त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला हे देखील या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र गिरी महाराजांनी लिहिलेली सुसाईड नोट ही सात ते आठ पानांची आहे.

आयजी प्रयागराज के पी सिंह यांनी असं म्हटलं आहे की सुसाईड नोट एखाद्या इच्छापत्राप्रमाणे लिहिण्यात आली आहे. यामध्ये आनंद गिरी यांच्यासहीत इतर काही जणांची नावं आहेत.या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

या घटनेची माहिती समोर येताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे आणि म्हटलं आहे की आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद आहे. अध्यात्मिक परंपरेला त्यांनी आयुष्य समर्पित केलं होतं. संत समाज जोडून ठेवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. या आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू होणं ही अध्यात्मिक जगताची फार मोठी हानी आहे या आशयाचं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी असं म्हटलं आहे की, ‘मला यावर विश्वासच बसत नाही की नरेंद्र गिरी महाराजांनी आत्महत्या केली असावी, मी स्तब्ध आहे, निशःब्द आहे. ‘ समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी असं म्हटलं आहे की नरेंद्र गिरी महाराजांचा निधन ही खूप मोठी हानी आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या अनुयायांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो..

आनंदगिरी यांना घेण्यात आलं ताब्यात

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांना हरिद्वारमधून ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस एडीजी लॉ एंड प्रशांत कुमार यांनी आनंद गिरी ला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. Uptak ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

    follow whatsapp