दुर्दैवी! पाच वर्षात पाच हजार महिलांची प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा प्रसूती दरम्यान मृत्यू

मुंबई तक

• 03:47 PM • 17 Nov 2021

हिंगोली येथील शासकीय रूग्णालयात मागील पाच वर्षांपासून प्रसूती विभागात पाच हजारांहून जास्त प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंतीच्या कारणांमुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. ज्योती गवळी असं या परिचारिकेचं नाव आहे. ज्योती गवळी (वय-38) या मागील पाच वर्षांपासून हिंगोलीच्या शासकीय रूग्णालयातील प्रसूती कक्षात अधीपरिचारिका म्हणून काम करत होत्या. मागील पाच […]

Mumbaitak
follow google news

हिंगोली येथील शासकीय रूग्णालयात मागील पाच वर्षांपासून प्रसूती विभागात पाच हजारांहून जास्त प्रसूती करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंतीच्या कारणांमुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. ज्योती गवळी असं या परिचारिकेचं नाव आहे.

हे वाचलं का?

ज्योती गवळी (वय-38) या मागील पाच वर्षांपासून हिंगोलीच्या शासकीय रूग्णालयातील प्रसूती कक्षात अधीपरिचारिका म्हणून काम करत होत्या. मागील पाच वर्षांच्या काळात त्यांनी पाच हजारांहून जास्त महिलांची प्रसूती केली. सिझेरियन शस्त्रक्रिया करतानाही त्यांचा मोठा सहभाग असे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे एक चांगल्या परिचारिका ही त्यांची ओळख होती.

2 नोव्हेंबरला त्यांना प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रसूती दरम्यान गुंतागुंतीच्या कारणांमुळे त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना मुलगा झाला. शस्त्रक्रिया होईपर्यंत त्या ठिक होत्या मात्र काही वेळाने त्यांना रक्तस्त्राव होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना नांदेडच्या रूग्णालयात नेण्यात आलं. नांदेडच्या रूग्णालयातही त्यांची प्रकृती खालावू लागली. त्यामुळे त्यांना नांदेड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ज्योती यांनी त्यांच्या बाळाला सिझेरियन पद्धतीने जन्म दिला. त्यानंतर त्यांना निमोनिया झाला. त्यावरचे उपचार हिंगोलीमध्ये अपुरे पडू लागले त्यामुळे त्यांना नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तेथील सरकारी रूग्णालयातून खासगी रूग्णालयातही दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

हिंगोलीच्या शासकीय रूग्णालयात डिलिव्हरी वॉर्ड मध्ये त्या कार्यरत होत्या. ज्योती गवळी यांनी पाच हजारांपेक्षा जास्त महिलांची प्रसूती केली होती. मात्र त्यांच्या दुसऱ्या प्रसूतीच्या दरम्यान गुंतागुंत निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

    follow whatsapp