महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांत पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुण्यासह चार जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून, भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बंगाल ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळपास चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, त्याच ठिकाणी कमी दाबाच्या पट्ट्याचे डिप्रेशनमध्ये रुपांतर झालंय. याचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोकण पट्ट्यासह विविध भागात संततधार पाऊस कोसळत असून, पुढील काही दिवस त्यात खंड न पडण्याचा अंदाज आहे.
रेड अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे
हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे ८ ऑगस्ट रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. IMD ने या चारही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यात मुंबई, ठाणे जिल्ह्यांपासून ते विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ८ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain : रायगड, रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ! जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली
९ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
१० आणि ११ ऑगस्ट रोजी या जिल्ह्यांत मुसळधार पावसांचा अंदाज
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत १० ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उर्वरित जिल्ह्यांतही मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
“IMD ने महाराष्ट्रासाठी 5 दिवसांच्या तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. त्यानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून जोरदार (vigorous) होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पुरजनक परिस्थितीची शक्यता असून, नदीकाठच्यांनी सावध राहावं, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.
ADVERTISEMENT
