उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : खासदार गजानन किर्तीकर यांचा अखेर शिंदे गटात प्रवेश

मुंबई तक

• 02:57 PM • 11 Nov 2022

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील आणखी एक खासदार गजानन किर्तीकर यांनी अखेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. रवींद्र नाट्यगृहातील एका कार्यक्रमाला किर्तीकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपस्थित आहेत. या दरम्यान हा प्रवेश पार पडला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार गजानन कीर्तिकर यांनी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील आणखी एक खासदार गजानन किर्तीकर यांनी अखेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. रवींद्र नाट्यगृहातील एका कार्यक्रमाला किर्तीकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपस्थित आहेत. या दरम्यान हा प्रवेश पार पडला.

हे वाचलं का?

मागील अनेक दिवसांपासून खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. या दरम्यान त्यांची अनेकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भेटी-गाठी झाल्या होत्या. तसंच किर्तीकर यांच्याकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही टीका करण्यात आली होती. मात्र किर्तीकर यांच्याकडून या सर्व चर्चांच सातत्यानं खंडन करण्यात येत होतं. अखेरीस या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

राष्ट्रवादीवर टीका :

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका कार्यक्रमात बोलत असताना खासदार किर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. राष्ट्रवादीची सध्या डँबिसगिरी सुरु आहे. आम्ही आपलं म्हणायचं की ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतंय पवार सरकार असं म्हणत किर्तीकरांनी आपली खदखद बोलून दाखवली होती. आम्ही फंडासाठी प्रयत्न करतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागतो पण मग नंतर हे पळवापळवी करतात, असंही ते म्हणाले होते.

एकनाथ शिंदे – गजानन किर्तीकरांची भेट :

सहा सप्टेंबरच्या मध्यरात्री खासदार गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावेळी खासदार किर्तीकर हे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनाला गेले होते, असे सांगण्यात आले होते. मात्र या भेटीत गणपती दर्शनासह राजकीय चर्चाही झाली असल्याची माहिती समोर आली होती. याच भेटीनंतर खासदार किर्तीकर देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली गेली होती.

याबाबत ‘मुंबई तक’शी बोलताना खासदार किर्तीकर म्हणाले, मी शिंदे गटात जाणार नाही. परवा मी वर्षा बंगल्यावर फक्त गणपती दर्शनाला गेलो होतो. यापूर्वीही विलासराव देशमुख यांच्या काळापासून मी प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो आहे, त्यात नवीन काहीच नाही. मी एकनाथ शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते सध्या मुख्यमंत्री आहेत. शिवाय मला माझ्या मतदारसंघाची काही काम वगैरे असली तर जावं लागतं. त्यामुळेच मी त्यांच्याकडे गेलो होतो.

सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यामध्येही एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी ही राजकीय भेट नसल्याचे म्हटले होते. किर्तीकर आजारी असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, आणि मनोहर जोशी यांचीही भेट घेतली होती.

    follow whatsapp