Mumbai Covid cases : मुंबईत 6 महिन्यांनंतर उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद; पॉझिटिव्हीटी रेट वाढला

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच मुंबईकरांच्या चिंतेत नवी भर पडली आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं असून, पॉझिटिव्हीटी रेटमध्येही मोठी वाढ झाली आहे. मुंबईत शनिवारी सहा महिन्यानंतर सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे मुंबई महापालिकेसह प्रशासन सज्ज झालेलं असतानाच शनिवारी तब्बल 757 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:37 AM • 26 Dec 2021

follow google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच मुंबईकरांच्या चिंतेत नवी भर पडली आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं असून, पॉझिटिव्हीटी रेटमध्येही मोठी वाढ झाली आहे. मुंबईत शनिवारी सहा महिन्यानंतर सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

हे वाचलं का?

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे मुंबई महापालिकेसह प्रशासन सज्ज झालेलं असतानाच शनिवारी तब्बल 757 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्याची जूननंतरची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 24 जून 2021 रोजी मुंबईत 789 रुग्ण आढळून आले होते. नंतर दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा कमी होत गेला. मात्र, पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे.

मुंबईत 182 दिवसानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले असून, मागील काही दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील कोरोनामुळे मृत्यूंवर अंकुश लावण्यात प्रशासनाला यश आलं असून, शनिवारी शून्य मृत्यूची नोंद झाली.

मागील पंधरा दिवसातील आकडेवारी काय सांगते?

11 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत मुंबईत दररोज झालेल्या चाचण्या आणि आढळून आलेल्या रुग्णसंख्येवर नजर टाकल्यास 21 डिसेंबरपर्यंत मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या वाढ स्थिर असल्याचं दिसतं. 11 डिसेंबर रोजी मुंबईत 44,380 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 256 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. शून्य मृत्यूची नोंद झाली होती.

12 डिसेंबर रोजीही 40031 चाचण्या करण्यात आल्या. 187 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. 17 डिसेंबर रोजी मुंबई तब्बल 51,266 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. 295 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 21 डिसेंबरपर्यंत रुग्णवाढीचा आलेख अडीचशे ते साडेतीनशेच्या दरम्यान स्थिरावलेला होता.

22 डिसेंबर रोजी मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली. 45,014 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 490 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर प्रत्येक दिवसाला रुग्णसंख्येत वाढ होत गेली. 23 डिसेंबर रोजी मुंबईत 39423 चाचण्या झाल्या, तर 602 रुग्ण आढळून आले. 24 डिसेंबर रोजी 40,472 चाचण्या करण्यात आल्या, तर 683 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 22 डिसेंबर रोजी मुंबईचा पॉझिटिव्ही रेट 1.09 टक्के होता, तो 25 डिसेंबर रोजी 1.78 टक्क्यांवर पोहोचला.

    follow whatsapp