अहंकारी उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकीत मुंबईकर त्यांची जागा दाखवतील असं वक्तव्य आता खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस तसंच शिंदे गटावर मुंबईतल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात टीका केली. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे नवनीत राणा यांनी?
उद्धव ठाकरेंची जी सभा झाली ती सभा नव्हती. ज्या पद्धतीने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं त्यातून त्यांचा अहंकार समोर आला. उद्धव ठाकरे हे काय आव्हान देत आहेत? देवेंद्र फडणवीसांना? हिंदीत एक म्हण आहे दुसरो के लिये जो गढ्ढा खोदता है वही उस गढ्ढेमें गिरेगा. तसंच मुंबई महापालिका निवडणुकीत होणार आहे. मुंबईकर अहंकारी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देतील. उद्धव ठाकरे दुसऱ्यांना म्हणतात की तुम्ही दिल्लीश्वरांपुढे झुकता. १० जनपथला सोनिया गांधींपुढे लोटांगण कुणी घातलं? असा सवालही नवनीत राणा यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांचं आक्रमक भाषण
मुंबईतल्या नेस्को मैदानात उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे या सगळ्यांचा समाचार घेतला. शिंदे गटाचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी मिंधे गट असा केला. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीश्वरांसमोर झुकले असंही त्यांनी म्हटलं होतं. अत्यंत आक्रमक भाषण करत त्यांनी दसऱ्या मेळाव्याला आपण काय आणि कशा प्रकारे बोलणार आहोत याची एक झलकच दाखवून दिली.
उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच आज दुपारीच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे असं म्हटलं आहे. सत्तेसाठी ते निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. त्यांनी गद्दारी केली असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. अशात आता खासदार नवनीत राणा यांनीही अहंकारी उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर त्यांची जागा दाखवतील असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
