शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत PMLA न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा तुरूंगातला मुक्काम ८ ऑगस्टपर्यंत वाढला आहे. ईडीने संजय राऊत यांच्यावर गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी कारवाई केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी सूचक इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत छगन भुजबळ संजय राऊत यांच्या अटकेबाबत?
संजय राऊत यांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील. नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या हे मी ऐकलेलं नाही. मात्र पुढच्या तपासासाठी अधिक तपासासाठी न्यायालयाने संजय राऊत यांच्या ईडी कोठडी वाढ केली असावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता होईल का या प्रश्नावर काय म्हटले भुजबळ?
संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता होईल का ? हा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की संजय राऊत निर्दोष सुटतील की नाही याबाबत निश्चित मला तसं काही सांगता येणार नाही. ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही याची सर्वांना कल्पना आहेच. त्यातूनही काही मार्ग निघालाच तर आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत असं उत्तर भुजबळ यांनी दिलं आहे.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शांत का? असं विचारलं असता भुजबळ म्हणाले क, असं काहीही नाही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत ईडीच्या कारवाईवर चर्चा घडवून आणली आहे. त्यात त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत. ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्याविषयी त्या बोलल्या. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षांसोबत आहे असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना समन्स पाठवण्यात आलेलं असून, पुढील तपास करण्याची गरज आहे. प्रविण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असून, या प्रकरणाचा अधिक खोलात जाऊन तपास करत आहोत, असं ईडीने न्यायालयात सांगितलं.
ज्या बँक खात्यांद्वारे व्यवहार झाला, ती अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे सर्व कागदपत्रे आणि समन्स बजावलेल्या लोकांची चौकशी करण्यासाठी वेळ हवाय. त्यामुळे १० ऑगस्टपर्यंत संजय राऊतांना कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने न्यायालयात केली.
सुरुवातीला १.०६ कोटी रुपये बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर १.१७ कोटी रुपये, आणि आता १.०८ कोटी रुपये पाठवण्यात आल्याचं ईडीने न्यायालयात सांगितलं. वर्षा राऊत (संजय राऊत यांच्या पत्नी) यांच्या खात्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली, असंही ईडीने युक्तिवादावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT











