साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात. नेत्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडतात असं म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे ढवळ्याशेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले बंडातात्या?
‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन नाचतात. सुप्रियाताई दाऊ पिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो ढिगाने मिळतील तुम्हाला. खासदार व्हायच्या आधीचे त्यांचे फोटो बघा. राजकारणात यायच्या आधी त्या दारू पिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळेंनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतोय. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पिऊन नाच करतात. पतंगराव कदमांचा एक मुलगा कसा मेला? दारूच्या नादातून कसा गेला जरा शोधा. माझा पत्रकारांना प्रश्न आहे की कुठल्या पुढाऱ्याचा मुलगा पित नाही असं तुम्हाला माहित असेल तर मला सांगा. कऱ्हाडचे बाळासाहेब आमदार त्यांचा मुलगा दारू पितो की नाही? सगळ्यांची नावं सांगू का? मी सांगू शकतो’ असं वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्र शासनाने मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेऊन दारूविक्रीचा अत्याचार लोकांवर लादलेला आहे. आम्ही त्याबाबत आम्ही पोटतिडिकीने काम करतो आहे. व्यसनमुक्त युवक संघ समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आहे. आता शासनाला इशारा देण्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलं आहे. आम्ही सरकारला इशारा देण्यासाठी दंडवत आंदोलन सुरू केलं आहे. असंही बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन थांबणार नाही यापुढे आंदोलन उग्र होत जाईल. त्यानंतर शासनाने जो वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे तो त्यांना मागे घ्यावाच लागेल असंही ते म्हणाले.
अजित पवारांवर टीका
अजित पवारांनी निर्णय घेतला दारू विक्रीचा. अजित पवारांनी सांगितलं मंदिरं उघडायची नाही. उद्धव ठाकरे त्यांचं ऐकतात. ढवळ्या म्हणजे अजित पवार आणि पोवळ्या म्हणजे उद्धव ठाकरे. ढवळ्या शेजारी बांधला पोवळा वाण नाही पण गुण लागला अशी सध्याची अवस्था आहे. मी जे बोललो त्याबाबत मी ठाम आहे. नेत्यांची मुलं दारू पितात. पित नसतील तर त्यांनी आमचं आव्हान स्वीकारावं मी पुरावे दाखवायला तयार आहे असंही बंडातात्या कराडकर म्हणाले.
ADVERTISEMENT
