पुरंदर : कार्यकर्ता कसा जपायचा याचं गमक सापडलेलं फार कमी राजकारणी असल्याचं बोललं जात. या यादीत सगळ्यात अग्रभागी नावं घेतलं जातं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं. ते अग्रभागी का आहेत याचं उत्तर कार्यकर्त्यांसोबतच्या त्यांच्या संवादातून वारंवार मिळतं असतं. पवार कधी अनेक वर्षांनंतर भेटलेल्या कार्यकर्त्याला नावानं हाक मारतात, तर रस्त्यात मध्येच गाडी थांबवून कार्यकर्त्याची आपुलकीनं विचारपूस करतात. कधी ते स्वतःच्या गाडीत बसवून कार्यकर्त्याला दौऱ्याला घेऊन जातात.
ADVERTISEMENT
नुकताच शरद पवार यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एका कार्यकर्त्याला आग्रह करत हाताला धरुन खुर्चीत बसवताना दिसत आहेत. एवढचं नव्हे तर त्या कार्यकर्त्यासोबत फोटोही काढताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हॅन्डेलवर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ पुरंदर तालुक्यातील असल्याच शेख यांनी सांगितलं आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन देत म्हटलं की, “पुरंदर तालुक्याचे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव हे आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांना कार्यालय भेटीला घेऊन आले! व खुर्चीवर बसण्याची विनंती केली. साहेब म्हणाले ‘ऑफिस तुमचं, खुर्ची तुमची’ स्वतः ऊभे राहिले व त्यांना स्वतः सन्मानाने बसवले. पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान फक्त साहेबच करू शकतात”, असही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार नावं कशी लक्षात ठेवतात?
शरद पवार यांची कार्यकर्त्यांची नाव लक्षात ठेवण्याची सवय देखील अनेकांच्या कुतुहलाचा विषय असतो. याबाबत त्यांनी स्वतः एका कार्यक्रमात खुलासा केला होता. ते म्हणाले होते, राजकारणात फार कमी कष्टानं आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळतं. फक्त तुम्ही समोरच्या माणसाचं नाव लक्षात ठेवलं पाहिजे.
यावेळी पवार यांनी एक किस्साही सांगितला होता. ते म्हणाले होते. “मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातलीच होती. तिचं काहीतरी काम होतं. मी तिला म्हटलं की, काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?” असा सवाल तिला केला होता. यावर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली. काम होवो न होवो, अशी तिची भावना होती, असही त्यांनी सांगितलं होतं.
पवार म्हणाले की, लोकांचं खूप छोट्या गोष्टीत सुख असतं. म्हणूनच या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या राजकारणात होत्या. पहिले यशवंतराव चव्हाण आणि दुसरे वसंतदादा पाटील. हे दोघे त्यांना कितीही जुना माणूस भेटला तरी ते त्यांचं नाव लक्षात ठेवायचे. अशा गुणांमुळे समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त होते. यश मिळते, असं त्यांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
