नाशिकमधील नियोजीत साहित्यसंमेलनात नवीन वादाला सुरवात, उद्घाटक जावेद अख्तरांच्या नावाला ब्राम्हण महासंघाचा प्रखर विरोध

मुंबई तक

• 05:59 AM • 23 Nov 2021

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उद्घाटन विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.मात्र […]

Mumbaitak
follow google news

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उद्घाटन विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.मात्र ब्राह्मण महासंघातर्फे जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

भगवंत पाठक यांच्या नेतृत्वाखाली साहित्य संमेलनाचे कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर यांना निवेदन देऊन जावेद अख्तर यांचे नाव वगळण्याची मागणी ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली आहे.

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी महासंघाची भूमिका स्पष्ट केली आहे. जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी नाट्य सृष्टीत काय योगदान आहे? वीर सावरकरांच्या भूमीत अख्तर, कशासाठी?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत

गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाला उद्घाटक म्हणून आधीच काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. मात्र, विश्वास पाटील यांचे नाव उद्घाटक म्हणून निश्चित झाल्यानंतर तो मावळला असला, तरीही प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांना विरोध करण्यात येत आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांच्या मते अख्तर यांचे मराठी साहित्यात काहीही योगदान नाही. त्यामुळे त्यांना उद्घाटक म्हणून बोलवू नये, अशी प्रतिक्रिया ब्राम्हण महासंघाच्यावतीने करण्यात येत आहे.

तसेच नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्यांना बोलावून साहित्य संमेलनचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत?, असा प्रश्न ब्राह्मण महासंघाने उपस्थित केलाय. दिब्रिटो असो की जावेद यांना ना हिंदू धर्माचं प्रेम ना त्याविषयी आदर. त्यामुळे या अशा या आत्मप्रेमी लोकांना अशा महत्वाच्या पदांचा सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका असल्याचं दवे यांनी म्हटलं आहे.

जयंत नारळीकरांसारखा अध्यक्ष असताना वीर सावरकर यांच्या भूमीत या विकृतांच्या हस्ते हे उदघाटन होण्यास आमचा विरोध राहील, असं दवे यांनी स्पष्ट केलं आहे.

संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार अशी माहिती स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.मराठी साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रशस्त मैदानावर पार पडणार आहे. तसेच या संमेलनात बालकवी संमेलन, कवी कट्टा, गझल आणि भव्य पुस्तकाचे प्रदर्शन यावेळी होणार आहे.

    follow whatsapp