शिवजयंती विशेष: समुद्र, आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराज!

मुंबई तक

• 02:30 AM • 19 Feb 2021

मुंबई: आपल्या कर्तृत्वाला जर दूरदृष्टीची जोड असेल तर माणूस हिमालयाला देखील टक्कर देऊ शकतो असं नेहमी म्हटलं जातं. पण दूरदृष्टी कशी असावी याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला इतिहासाची पानं चाळल्यानंतर अवघ्या काही क्षणात सापडू शकतं. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! आरमाराबाबत शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होय… छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजवर जे काही कार्य केलं […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: आपल्या कर्तृत्वाला जर दूरदृष्टीची जोड असेल तर माणूस हिमालयाला देखील टक्कर देऊ शकतो असं नेहमी म्हटलं जातं. पण दूरदृष्टी कशी असावी याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला इतिहासाची पानं चाळल्यानंतर अवघ्या काही क्षणात सापडू शकतं. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!

हे वाचलं का?

आरमाराबाबत शिवाजी महाराजांची दूरदृष्टी

होय… छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजवर जे काही कार्य केलं त्यामागे प्रचंड मोठी दूरदृष्टी होती. त्यामुळेच तब्बल ३५० साडेतीनशे वर्षानंतरही त्यांचं कार्य हे अबाधित आहे. शिवाजी महाराजांनी तत्कालीन काळात संरक्षणाच्या दृष्टीने केलेलं कार्य हे किती महत्त्वाचं होतं हे आजच्या परिस्थितीवरुन देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं. भविष्यात भारत भूमीवर समुद्रमार्गे देखील शत्रूकडून हल्ला होऊ शकतो हे साडेतीन वर्षांपूर्वीच महाराजांनी ताडलं होतं. यामुळेच त्यांनी समुद्रावर आपलं आरमार स्थापन केलं. याच आरमाराची परिणीती आपल्याला आजच्या अत्याधुनिक नौदलामध्ये दिसतं.

‘ज्याचं आरमार, त्याचा समुद्र’

‘ज्याचं आरमार, त्याचा समुद्र’ हे गणित मांडणाऱ्या शिवाजी महाराजांनी 1658 साली आपलं स्वत:चं असं आरमार स्थापन केलं. आरमार म्हणजे समुद्रात लढणारं लष्कर असं त्याचं स्वरुप होतं आणि त्याची बांधणी देखील त्यांनी तशाच स्वरुपाची केली होती. आरमाराचे सरनौबत, सरखेल असे हुद्दे निर्माण करुन महाराजांनी आपल्या आरमाराची एक आखीव, रेखीव अशी मांडणी केली. महाराजांनी केलेली हीच रचना आज देखील आपल्याला लागू पडत आहे. कालानुरुप आपल्या नौदलात बदल झाले आहेत. त्याचं आधुनिकीकरण झालं आहे. पण तरीही त्याचा मूळ पाया हा छत्रपतींच्या आरामारावरच आधारलेला आहे.

जलदुर्गांची निर्मिती

समुद्रावर सत्ता स्थापन केल्यास भविष्यात त्यातून काय-काय फायदा होऊ शकतं हे महाराजांनी वेळीच जाणलं होतं आणि त्यामुळे त्यांनी आरमाराची स्थापना तर केलीच पण यासोबतच जलदुर्गांच्या बांधणीचं कार्य देखील हाती घेतलं. कोणतीही अत्याधुनिक साधन-संसाधनं नसताना भर समुद्रात उभारलेल्या जलदुर्गांकडे आजही एक प्रकारचं आश्चर्य म्हणूनच पाहिलं जातं. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी, पद्मदुर्ग यासारखे अनेक जलदुर्ग बांधून शिवाजी महाराजांनी समुद्रावर आपली सत्ता स्थापन केली. ज्याला आरामाराची उत्कृष्ट अशी जोड मिळाली. योग्य गोष्टींची सांगड घातल्यास इतिहास रचता येतो हेच महाराजांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिलं.

जलदुर्ग आणि रोजगार

जलदुर्गांची निर्मिती केल्याने स्थानिक बंदरं आणि पर्यायाने अनेक व्यापार हे उदयास आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. आजही सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या जलदुर्गांमुळे येथे एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जे बीज रोवलं होतं त्याचा आज वटवृक्ष झाला आहे आणि त्याच वटवृक्षाची फळं आजची पिढी चाखत आहे. हे फक्त शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं एक साधं उदाहरण आहे. यासारख्या अनेक गोष्टी महाराजांनी करुन ठेवल्या आहेत. फक्त त्याची जाणीव असणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपणा सर्वांसाठीच आनंदोत्सव असतो. त्यामुळे या दिवशी आपल्या सर्वांच्याच आनंदाला उधाण आलेलं असतं. मात्र, असं असलं तरी सध्याच्या परिस्थिती आपण महाराजांचे विचार आणि त्यांचं कार्य कसं पुढे नेतो हे देखील तितकचं महत्त्वाचं आहे. तसं करणं हीच महाराजांना खरी मानवंदना ठरणार आहे.

    follow whatsapp