ST Strike : तुम्ही आमचेच आहात; मुख्यमंत्री ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन

“तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केलं. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासह आपल्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:05 AM • 10 Nov 2021

follow google news

“तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केलं.

हे वाचलं का?

एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासह आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं राज्यात प्रवाशांचे हाल होत असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सरकारने विलिनीकरणासाठी समितीही स्थापन केली आहे. तर दुसरीकडे संप सुरूच आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊलं उचलत आहोत ते सांगितले असून, न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.”

“अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा, अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.”

राजकीय पक्षांना टोला

“राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे.

    follow whatsapp