विधानपरिषदेत घमासान : प्रवीण दरेकर आणि अनिल परबांमध्ये जुंपली

मुंबई तक

• 01:27 PM • 02 Mar 2021

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार, दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर किल्ला लढवत सरकारला धारेवर धरलं. मंगळवारी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झालेलं पहायला मिळालं. विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर सभागृहात बोलत असताना राज्यातील आदिवासी विकास, कोकणातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेबद्दल […]

Mumbaitak
follow google news

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार, दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर किल्ला लढवत सरकारला धारेवर धरलं. मंगळवारी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झालेलं पहायला मिळालं. विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर सभागृहात बोलत असताना राज्यातील आदिवासी विकास, कोकणातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेबद्दल भाषण करत होते. यावेळी अनिल परब यांनी दरेकर यांच्या भाषणात व्यत्यय आणत भाषणातली काही पानं मिसींग असल्याचं म्हणत हे मुद्दे खालच्या सभागृहात मांडण्यात आल्याचं सांगितलं.

हे वाचलं का?

यानंतर संतापलेल्या विरोधीपक्षाने सभागृहात गोंधळ घालून अनिल परब यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली. “विरोधीपक्षाने सभागृहात काय बोलावं हे आता सरकारचे मंत्री ठरवणार का?? मी या प्रकाराचा निषेध करतो. खालच्या सभागृहात काय चर्चा झाली हे वरच्या सभागृहात बोलता येत नाही. हा सत्तेचा माज आहे, इथल्या सदस्यांनी काय बोलावं हे आता सरकारमधील मंत्री सांगणार का” असा प्रश्न विचारत दरेकरांनी आक्रमक भूमिका मांडली.

अवश्य वाचा – ठाकरे सरकार मला ‘नारायण भंडारी’सारखं वाटतं असं का म्हणाले फडणवीस?

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अनिल परब यांनी आपली बाजू मांडताना…दरेकर हे माझे चांगले मित्र आहेत. ते भाषण करत असताना त्यांच्या भाषणातले काही मुद्दे मिसींग असल्यामुळे लिंक लागत नाही मी एवढंच नमूद केलं. त्यांच्याबद्दल मला आदर आहे, ते माझे जुने मित्र आहेत. मी कोणत्याही प्रकारे विरोधी पक्षनेत्यांचा अपमान केला नसल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. यानंतर उप-सभापती निलम गोर्हे यांनी काहीवेळासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. अनिल परबांच्या माफीवर अडून बसलेल्या विरोधीपक्षाने यानंतर सभागृहातून वॉकआऊट केलं.

अवश्य वाचा – ‘तुम्हाला रात्री झोप लागणार नाही’, पूजा प्रकरणी फडणवीसांनी सुनावलं

    follow whatsapp