उद्धव ठाकरेही ‘राज्यपाल हटाव’साठी मैदानात : भाजपमधील लोकांनाही सोबतही घेण्याची तयारी

मुंबई तक

• 12:24 PM • 24 Nov 2022

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे ही मैदानात उतरले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना हटविण्यासाठी येत्या-दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र बंदची हाक देणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं आहे. यासाठी प्रसंगी भाजपमधील महाराष्ट्रप्रेमींनाही सोबत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे ही मैदानात उतरले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना हटविण्यासाठी येत्या-दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र बंदची हाक देणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं आहे. यासाठी प्रसंगी भाजपमधील महाराष्ट्रप्रेमींनाही सोबत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे वाचलं का?

राज्यपाल हटाव मोहिम : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रात ज्या विचारांचं सरकार आहे, त्यांच्याच विचारांचे राज्यपाल पाठविले जात असतात. त्या माणसाची कुवत, पात्रता काय असते? ज्येष्ठांनी गैरसमज करुन घेऊ नये, पण ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते अशांना राज्यात राज्यपाल म्हणून पाठविलं जातं का? हा ही प्रश्न विचारायला पाहिजे.

राज्यपाल नियुक्तीचे निकष आता ठरवायला हवेत. राज्यपालही राष्ट्रपतींप्रमाणे निष्पक्ष असावेत. राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घेतलं जातं. पण कोणत्याही व्यक्तीवर राज्यपाल पदाची झूल पांघरली म्हणून त्यांनी वेडेवाकडे बोलावे हे मान्य करणार नाही.

आधी मराठी माणूस आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी वक्तव्यं केली. पण बाप हा बाप असतो, तो नवा-जुना कसा म्हणायचा? केंद्रात ज्या विचारांचं सरकार, त्याच विचारांच्या राज्यपालांना पाठविलं जातं. त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारींच्या सडक्या डोक्यामागे कोण आहे हे शोधण्याची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका :

महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणं सुरु आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले. काल तर मी ऐकलं कॅबिनेटची बैठक रद्द झाली. मीही मुख्यमंत्री होतो. केवळं अपवादात्मक परिस्थितीमध्ये कॅबिनेटची बैठक पुढे ढकलली जाते. अपवादात्मक परिस्थिती काय होती तर बरेचसे लोकं हे गुजरातमध्ये प्रचाराला गेले होते. म्हणजे यांना महाराष्ट्र उघड्यावर पडला आहे, त्याची खंत नाही. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान होतोय त्याची खंत नाही.

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होतोय. या सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही हा प्रश्न आहे. त्यांना विचारलं तर म्हणतील की, पंतप्रधानांशी बोलणं झालयं, महाराष्ट्राची ४० गावं घेतली तर घेऊ दे. पाकव्याप्त काश्मीर घेतल्यावर तुम्हाला १०० गावं देणार आहे, असंही ते म्हणतील. त्यांच्याकडून माझी काही अपेक्षा नाही, उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारवं करत आहेत.

माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी हे सॅम्पल दुसरीकडे पाठवावा. अन्यथा दोन ते तीन दिवसांत राज्यव्यापी आंदोलन उभं करणार. त्यासाठी पक्ष बाजून ठेऊन महाराष्ट्र प्रेमी आहेत, अगदी भाजपमधीलही महाराष्ट्रप्रेमी सोबत आले तर त्यांना सोबत घेऊन आंदोलन उभं करु. शांततेमध्ये महाराष्ट्र बंद किंवा आणखी काही करता येईल. ते पण एकत्र येऊन या महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवणं गरजेचं आहे, अस मतं त्यांनी व्यक्त केलं.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा समाचार :

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून विषेशतः राज्यात मिंधे सरकार आल्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलं आहे. जणू काही महाराष्ट्रामध्ये माणसं राहतं नाही, महाराष्ट्रात हिंमत, धमक, अस्मिता, स्वाभिमान काहीच नाही. कोणीही यावं आणि टपली मारावं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं. महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

    follow whatsapp