Vaibhav Suryavanshi : अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने भीमपराक्रम केला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत त्याने 80 चेंडूत 175 धावांची विक्रमी खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 15 उत्तुंग षटकारांची आतिषबाजी केली. त्याच्या या तडाखेबाज बॅटिंगची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. त्याच्या या खेळीबद्दल मिश्किल टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आइसलँड क्रिकेट बोर्डच्या एका पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. वैभव सूर्यवंशीला तात्काळ अटक करा अशी एक मजेशीर मागणी आईसलँड क्रिकेट बोर्डने एक्सवर पोस्ट करुन केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईची खबर: मुंबई सेंट्रलला जोडणाऱ्या 'या' ब्रिजचं काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार
वैभवने रचला इतिहास
झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर अंडर-19 वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध इंग्लंड असा फायनल सामना रंगला आहे. भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने 80 चेंडूत 175 धावा केल्या. या खेळीत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सगळ्यात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. तसेच अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी उन्मुक्त चंद (2012) आणि मनजोत कालरा (2018) यांनी अशी कामगिरी केली आहे. याशिवाय वैभवने केलेली ही खेळी कोणत्याही आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमधील सर्वात वेगवान खेळी ठरली. याआधी ट्रॅव्हिस हेडने 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध 163 चेंडूंमध्ये 174 धावा केल्या होत्या.
'वैभवला तात्काळ अटक करा'
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्याच्या या खेळीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा घेतलेला समाचार बघून आईसलँड क्रिकेटने एक मिश्लिल टिप्पणी केली आहे. एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, 'कोणीतरी वैभव सूर्यवंशीला तात्काळ अटक करा. मैदानावर सुरु असलेला इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध सुरु असलेला हिंसाचार हा एक्स-रेटेड आहे!' ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी आता यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
हे ही वाचा : Black Box म्हणजे काय? अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपास प्रक्रियेत किती महत्त्वाचा?
भारताने रचला धावांचा डोंगर
भारताने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत भारतीय फलंदाजांनी ९ गड्यांच्या मोबदल्यात 411 धावांचा डोंगर रचला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला 20 धावांवर पहिला धक्का बसला. आरोन जॉर्ज 11 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 9 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी 142 धावांची शानदार भागीदारी केली. म्हात्रे 51 चेंडूंत 53 धावा (7 चौकार, 2 षटकार) करुन बाद झाला. दरम्यान वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत दीडशतकी खेळी केली. वेदांत त्रिवेदीने 36 चेंडूंत 32, विहान मल्होत्राने 36 चेंडूंत 30 आणि यष्टिरक्षक अभिज्ञान कुंडूने 31 चेंडूंत 40 धावांचे योगदान दिले. कनिष्क चौहान 20 चेंडूंत 37 धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना सेबेस्टियन मॉर्गनने 9 षटकांत 74 धावा देऊन 2 बळी घेतले. एलेक्स ग्रीनने ५ षटकांत ४९ धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले, तर जेम्स मिंटोने 8 षटकांत 63 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय मॅनी लुम्सडेनला 1 विकेट मिळाली.
ADVERTISEMENT











