विधान परिषद निवडणूक : आघाडीतच कुरघोड्या! शिवसेना समर्थक आमदारांना राष्ट्रवादी-काँग्रेसकडून फोन

विधान परिषद निवडणुकीसाठी कोण कसं मतांचं गणित जुळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना एक महत्त्वाची माहिती समोर आलीये. आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतच कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना राष्ट्रवाद आणि काँग्रेसच्या नेत्यांनी फोन केले. त्यामुळे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाल्याचे समजते. विधान परिषद निवडणुकीसाठीच मतदान तीन दिवसांवर येऊन […]

Mumbai Tak

ऋत्विक भालेकर

• 06:20 AM • 17 Jun 2022

follow google news

विधान परिषद निवडणुकीसाठी कोण कसं मतांचं गणित जुळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना एक महत्त्वाची माहिती समोर आलीये. आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतच कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना राष्ट्रवाद आणि काँग्रेसच्या नेत्यांनी फोन केले. त्यामुळे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाल्याचे समजते.

हे वाचलं का?

विधान परिषद निवडणुकीसाठीच मतदान तीन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे भाजपबरोबरच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सध्या मतांची जुळवाजुळव करण्यात लागली आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून आणि नेत्यांकडून अपक्षांची मनधरणी सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. बहुजन विकास आघाडीची तीन मतं असून, ही मतं मिळवण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

त्यातच आता शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्षांनाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून जवळ करण्याचे प्रयत्न केले जात आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मतं स्वतःच्या पारड्यात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते समर्थक अपक्ष आमदारांना फोन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेला समर्थन देणाऱ्या गीता जैन आणि मंजुळा गावित यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून फोन गेल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडून भेटीसाठी बोलावलं गेलं असल्याची माहिती असून, काँग्रेसनंही भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या आमदारांना रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, भाई जगताप यांनी फोन केल्याची माहिती मिळतेय.

मुख्यमंत्री ठाकरे संतापले

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेना समर्थक आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले जात असल्यानं मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणार नाही, त्याचबरोबर शिवसेना समर्थक अपक्ष उमेदवारांची मतंही शिवसेनेच्याच उमेदवारांना देण्याच्या भूमिकेत शिवसेना असल्याचे समजते.

आज बैठक

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, आज शिवसेना आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांची बैठक बोलावण्यात आलीये. सायंकाळी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक होणार आहे.

    follow whatsapp