22 वर्षांपूर्वी कारगीलच्या पर्वत रांगामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात भारताने आजच्याच दिवशी विजय मिळवला होता. या युद्धाची सुरूवात तेव्हा झाली जेव्हा पाकिस्तानने कारगीलच्या उंच पर्वतरांगांमध्ये घुसखोरी करून आपले ठिकाणे तयार केले होते. सुरूवातीला भारतीय लष्कराला याबाबत माहिती नव्हती मात्र जेव्हा भारतीय लष्कराला ही बाब समजली तेव्हा त्यांनी शत्रूशी दोन हात केले आणि या ठिकाणाहून पाकिस्तानी जवानांना मागे हटण्यास भाग पाडलं, कारगीलच्या दुर्गम अशा भागात तिरंगा फडकवला. त्यामुळेच आजचा दिवस हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
ADVERTISEMENT
कारगीलच्या युद्धाची सुरूवात मे 1999 मध्ये झाली होती. या साठी जी मोहिम आखण्यात आली त्या मोहिमेचं नाव ऑपरेशन विजय असं होतं. 26 जुलै 1999 ला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताचा कारगील युद्धात विजय झाल्याची घोषणा केली होती. त्यामुळे 1999 पासून आजच्या दिवशी म्हणजेच 26 जुलैच्या दिवशी विजय दिवस साजरा करण्यात येतो.
पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्याची सवय सोडलेली नाही हे आपल्याला माहित आहेच. छुपे हल्ले करणं, भ्याडपणे घुसखोरी करणं ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. अशाच प्रकारे नोव्हेंबर 1998 पासून पाकिस्तानने कारगीलमध्ये त्यांची तयारी सुरू केली होती. नोव्हेंबर 1998 मध्ये पाकिस्तानी सेनेच्या ब्रिगेडियरला कारगील भागात रेकी साठी पाठवण्यात आलं. त्या ब्रिगेडियरने जो अहवाल दिला त्यानंतरच कारगीलमध्ये घुसखोरी करण्यात आली. जानेवारी 1999 मध्ये स्कर्दू आणि गिलगिट मध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी सैन्यातील सगळ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. पाकिस्तानमध्ये असलेले हे भागही उंच डोंगऱाळ भागात आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या चौक्या सोडून जवान सुट्टीला जातात. मात्र जानेवारी 1999 मध्ये या जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आणि त्यांना कारगीलबाबत सांगण्यात आलं. ज्यानंतर थंडीचा मोसम संपेपर्यंत 200-300 वर्ग किमी चा भागात पाकिस्तानने कब्जा केला.
मे 1999 पर्यंत अत्यंत शांत आणि सुनियोजीतपणे हे सगळं सुरू होतं त्यामुळे भारतीय लष्कराला याची माहिती झाली नाही. मात्र एकदा गस्त घालत असताना भारतीय जवानांना हे दिसलं की आपल्या देशाच्या चौक्यांवर काही सशस्त्र लोकांनी कब्जा केला आहे. ही बाब तातडीने लष्कर प्रमुखांना सागण्यात आली. त्यानंतर लगेचच म्हणजेच 8 मे 1999 ला युद्ध सुरू झालं. भारतीय जवानांनीही त्या उंचीवर जाऊन पाकिस्तानी सैन्याशी मुकाबला केला. ऑपरेशन विजय हे 8 मे 1999 लाच सुरू झालं होतं. भारतीय लष्करासोबतच भारतीय वायुसेनेनेही या युद्धात भाग घेतला. आपल्या लष्कारासमोर मुख्य समस्या ही होती की त्यांन खालून वर जायचं होतं आणि घुसखोर हे उंच भागांमध्ये होते. तरीही भारतीय सेनेने प्रत्येकाला टिपलं आणि पाकिस्तानचा डाव उधळून लावला. 26 जुलै 1999 ला भारतीय लष्कराने आपला तिरंगा कारगीलमध्ये फडकवला आणि तेव्हापासूनच आजचा दिवस हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात पाकिस्तानचे 600 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. तर 1500 हून जास्त सैनिक जखमी झाले. भारताचे 562 सैनिक शहीद झाले तर 1300 हून जास्त सैनिक जखमी झाले. जगातल्या उंच भागांमध्ये लढण्यात आलेल्या लढायांपैकी कारगीलची लढाई आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ ही लढाई सुरू होती.
ADVERTISEMENT
