मंकीपॉक्स आहे की कोरोना, कसं ओळखायचं? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या दोन्ही आजारांमधील फरक

मुंबई तक

• 11:59 AM • 28 Jul 2022

जगाने नुकतेच कोरोनासोबत (Covid-19) जगायला सुरुवात केली होती, परंतु आता एका धोकादायक विषाणूने एन्ट्री केली आहे. या विषाणूचे नाव आहे – मंकीपॉक्स. मंकीपॉक्स (Monkeypox) सध्या किती वेगाने पसरत आहे?. 6 मे रोजी जगात पहिला रुग्ण आढळून आला तर आता 18 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो. वाढत्या संसर्गामुळे जागतिक आरोग्य […]

Mumbaitak
follow google news

जगाने नुकतेच कोरोनासोबत (Covid-19) जगायला सुरुवात केली होती, परंतु आता एका धोकादायक विषाणूने एन्ट्री केली आहे. या विषाणूचे नाव आहे – मंकीपॉक्स. मंकीपॉक्स (Monkeypox) सध्या किती वेगाने पसरत आहे?. 6 मे रोजी जगात पहिला रुग्ण आढळून आला तर आता 18 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो. वाढत्या संसर्गामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

हे वाचलं का?

डब्ल्यूएचओच्या मते, जगातील 78 देशांमध्ये 18 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी 70 टक्के प्रकरणे युरोपात आणि 25 टक्के अमेरिकेत आढळून आली आहेत. मंकीपॉक्समुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, केवळ 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

भारतातही आतापर्यंत मंकीपॉक्सचे ४ रुग्ण आढळून आले आहेत. केरळमध्ये तीन आणि दिल्लीत एक रुग्ण आढळून आला आहे. संसर्ग वाढण्याची भीती असताना केंद्र सरकारने मंकीपॉक्सवर लस तयार करण्यासाठी टेंडर काढले आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्या प्रकारची खबरदारी घेण्यास सांगितले जात होते, तशीच खबरदारी मंकीपॉक्सपासूनही घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा स्थितीत मंकीपॉक्स आणि कोरोनाच्या या दोघांमध्ये काय फरक आहे. हे दोन्ही विषाणू भिन्न आहेत आणि त्यांची लक्षणे देखील भिन्न आहेत.

1. मंकीपॉक्स – कोरोना यांच्या विषाणूमधील फरक काय?

दोन्ही आजारांचे विषाणू पूर्णपणे भिन्न आहेत. कोरोना विषाणू SARS-COV-2 मुळे होतो. तर, मंकीपॉक्सचा Poxviridae या कुटुंबातील ऑर्थोपॉक्स विषाणू आहे. व्हॅरिओला व्हायरस देखील याच कुटुंबातील आहे. SARS-COV-2 हा एक नवीन विषाणू आहे, जो 2019 मध्ये पसरण्यास सुरुवात झाली. तर, मंकीपॉक्स अनेक दशकांपासून आपल्यामध्ये आहे.

2. मंकीपॉक्स – कोरोना यांच्या लक्षणांमधील फरक काय?

मंकीपॉक्स आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. तथापि, जेव्हा कोरोना असतो तेव्हा ही लक्षणे अधिक गंभीर असू शकतात, तर मंकीपॉक्समध्ये ते इतके गंभीर नसतात.

मंकीपॉक्सची लक्षणे

– ताप.

– त्वचेवर पुरळ येणे. हे चेहऱ्यापासून सुरू होऊन हात, पाय, तळव्यापर्यंत वाढू शकते.

– सुजलेल्या लिम्फ नोड. म्हणजेच शरीरात गाठी तयार होणे.

– डोकेदुखी, स्नायू दुखणे किंवा थकवा.

– घसा खवखवणे आणि खोकला येणे.

कोरोनाची लक्षणे

– ताप किंवा थंडी वाजून येणे.

– घसा खवखवणे आणि खोकला.

– श्वास घेण्यास त्रास होणे.

– डोकेदुखी, थकवा, स्नायू आणि शरीर दुखणे.

– चव न लागणे किंवा वास कमी येणे.

– वाहणारे नाक, उलट्या किंवा जुलाब.

3. मंकीपॉक्स – कोरोना यांचा संसर्ग कसा पसरतो?

मंकीपॉक्स: डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार हा रोग प्राण्यांपासून मानवांमध्ये आला आहे. 50 वर्षांपूर्वी त्याचे मानवांद्वारे संक्रमण सुरू झाले. संक्रमित व्यक्ती इतरांना देखील संक्रमित करू शकते. संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने, त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याने किंवा त्याचे कपडे आणि इतर गोष्टी वापरून हा संसर्ग पसरू शकतो.

कोरोना: हा विषाणू कुठून आला याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा नाही. 2019 च्या शेवटी, चीनच्या वुहान शहरात त्याचा प्रसार सुरू झाला आणि नंतर तो जगभर पसरला. संक्रमित व्यक्ती इतरांना देखील संसर्ग पसरवू शकते. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने, त्याच्या वस्तू वापरल्याने संसर्ग पसरू शकतो. एवढेच नाही तर कोणत्याही पृष्ठभागावर विषाणू असल्यास तेथूनही संसर्ग पसरू शकतो.

4. मंकीपॉक्स आणि कोरोना यांमध्ये फरक कसा?

मंकीपॉक्स आणि कोरोना विषाणू हे दोन्ही संसर्गजन्य रोग आहेत. मंकीपॉक्स पेक्षा कोरोना जास्त संसर्गजन्य आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामुळे आणि शिंकण्याने कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. जर तुम्ही कोरोनाबाधित व्यक्तीजवळ उभे असाल तर तुम्हालाही संसर्ग होण्याचा धोका आहे. पण मंकीपॉक्सच्या बाबतीत असे होत नाही. जर तुम्ही मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीपासून अंतर राखत असाल आणि मास्क घातला तर संसर्ग टाळता येईल.

5. मंकीपॉक्स आणि कोरोनाच्या रोगांमध्ये काय फरक?

कोरोना विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो. यामुळे श्वास घेण्यात अडचण किंवा त्रास होतो. तर मंकीपॉक्सची लागण झाल्याने शरीरावर पुरळ येते.

6. मंकीपॉक्स वि. कोरोना कोणता आजार अधिक गंभीर?

अनेक वेळा कोरोनाचा संसर्ग झाला की तो इतका गंभीर होतो की मृत्यूचा धोका वाढतो किंवा मृत्यूही होतो. तर, मंकीपॉक्स केवळ काही प्रकरणांमध्येच प्राणघातक ठरतो. कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 64.12 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मंकीपॉक्समुळे आतापर्यंत 5 जणांना जीव गमवावा लागला आहे.

7. मंकीपॉक्स वि कोरोना: लक्षणे किती काळ टिकतात?

कोरोना विषाणूचा लक्षणे टिकण्याचा कालावधी 14 दिवसांचा असतो, तर मंकीपॉक्सचा कालावधी 21 दिवस असतो. हा कालावधी म्हणजे संसर्ग झाल्यानंतर किती दिवसांनी लक्षणे दिसू शकतात. काही वेळा संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी लक्षणे दिसू लागतात, परंतु काहीवेळा यास वेळ लागतो. जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल तर 14 दिवसात लक्षणे दिसू शकतात. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला मंकीपॉक्सची लागण झाली असेल, तर 21 दिवसांच्या आत लक्षणे दिसू शकतात.

8. मंकीपॉक्स विरुद्ध कोरोना: किती दिवसात बरा होऊ शकतो?

लसीकरणानंतर कोरोनाची लागण झाल्यानंतर या आजारातून बरे होण्यास जास्त वेळ लागत नाही. माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यास 4-5 दिवसात बरा होऊ शकतो. मात्र, बरे झाल्यानंतर अनेक दिवस काही खबरदारी घ्यावी लागते. त्याच वेळी, मंकीपॉक्सवर अद्याप कोणतेही ठोस उपचार नाहीत. आणि 2 ते 4 आठवड्यांनंतर तो स्वतःच बरे होऊ शकते.

9. मंकीपॉक्स वि कोरोना: लस प्रभावी आहे का?

जगभरात दीड वर्षांपासून कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. भारतातही 200 कोटींहून अधिक डोस दिले गेले आहेत. लस कोरोनाविरूद्ध अत्यंत प्रभावी ठरली असून गंभीर आजारापासून संरक्षण करण्यातही ती यशस्वी ठरली आहे. त्याच वेळी, मंकीपॉक्ससाठी कोणतीही विशिष्ट लस नाही. पण या आजारावर चेचक लस प्रभावी आहे. एका अभ्यासानुसार, मंकीपॉक्सवर स्मॉलपॉक्सची लस 85 टक्के पर्यंत प्रभावी आहे.

10. मंकीपॉक्स वि. कोरोना : पुढे काय?

मंकीपॉक्स आणि कोरोना दोन्ही झपाट्याने वाढत आहेत. लसीकरण असूनही जगभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. भारतातही संसर्गाचा वेग वाढत आहे आणि काही दिवस सरासरी 20 हजार रुग्णांची नोंद होत आहे. केवळ लसीकरणानेच या साथीवर नियंत्रण मिळवता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, मंकीपॉक्सबद्दल, डब्ल्यूएचओ म्हणतो की हा रोग पसरण्यापासून रोखला जाऊ शकतो. डब्ल्यूएचओ म्हणते की लोकांनी सावधगिरी बाळगली तर मंकीपॉक्सचा प्रसार रोखता येईल.

    follow whatsapp