हलगर्जीपणाचा कळस ! पोलिओ ऐवजी दिला काविळीच्या लसीचा डोस, ३ डॉक्टरांसह नर्स आणि आरोग्यसेविका निलंबीत

मुंबई तक

• 12:52 PM • 28 Dec 2021

उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रावर २१ डिसेंबर रोजी मुलांना पोलिओ ऐवजी काविळीच्या लसीचा डोस दिला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तात्काळ कारवाई करत ३ डॉक्टरांसह नर्स आणि आरोग्यसेविकेचं निलंबन केलं आहे. आरोग्य केंद्रावर ७ बालकांना चुकीचा डोस दिला गेल्याचं उघड झालंय. सोलापूर जिल्ह्यात […]

Mumbaitak
follow google news

उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रावर २१ डिसेंबर रोजी मुलांना पोलिओ ऐवजी काविळीच्या लसीचा डोस दिला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तात्काळ कारवाई करत ३ डॉक्टरांसह नर्स आणि आरोग्यसेविकेचं निलंबन केलं आहे. आरोग्य केंद्रावर ७ बालकांना चुकीचा डोस दिला गेल्याचं उघड झालंय.

हे वाचलं का?

सोलापूर जिल्ह्यात सध्या पोलिओ लसीकरणाची मोहीम ग्रामीण पातळीवर सुरु आहे. या मोहीमेचाच एक भाग म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी प्राथमिक आरोग्यकेंद्रावरही मोहीम सुरू असताना आरोग्यसेविका नयना शिंदे यांच्याकडून ७ बालकांना पोलिओ ऐवजी काविळीच्या लसीचा डोस दिला गेला. ज्यानंतर या बालकांची तब्येत बिघडली. या सर्व बालकांना यानंतर चिरायू बालरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

७ बालकांपैकी तीन बालकांना काविळीच्या लसीची रिअॅक्शन झाली तर एक बाळ बेशुद्ध पडलं होतं. उर्वरित तीन बालकांना किरकोळ ताप आला होता. यावेळी झालेल्या चौकशीत कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत केंद्रावरील आरोग्यसेविका नयना शिंदे, परिचारिका मंगला जोशी यांच्यासह तालुका सहाय्यक डॉ.अमृता डावरे, डॉ.अनंत गोडसे , डॉ.सुनंदा राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दोन वर्षापूर्वी बेलाटी गावाजवळच असणारे डोणगाव येथेही अशाप्रकारे चुकीची डोस दिल्याने बालकाचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण चालू असतानाच बेलाटी येथे दुसरी घटना घडली आहे. या प्रकरणाला संबंधित आरोग्य सेविकेवर निलंबनाची कारवाई झाली होती. परंतू मयत झालेल्या त्या बालकाच्या आई वडिलांना अद्याप कोणतीही शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. अद्याप ते कुटुंबीय जिल्हा परिषदेमध्ये हेलपाटे मारून थकले आहे. मात्र त्या गोष्टीकडे अद्याप प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp