Sanjay Raut Book Narkatla Swarga : संजय राऊत यांचं बहुप्रतिक्षित पुस्तक नरकातला स्वर्ग याचं उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यापूर्वीच या पुस्तकातील काही उल्लेखांची सध्या मोठी चर्चा होतेय. संजय राऊत यांनी या पुस्तकात अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या काही दावे आणि गौप्यस्फोटांमुळे सध्या राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
"अमित शाह मदत मागण्यासाठी मातोश्रीवर आले"
संजय राऊत यांनी या पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार, गुजरात दंगलीतील काही गंभीर प्रकरणांचा तपास सीबीआयकडे होता. त्या काळात तरुण नेते असलेले अमित शाह यांना मोठ्या कायदेशीर संकटांचा सामना करावा लागला होता. या कठीण प्रसंगी त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आधार मिळाला, ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासातील मोठी अडचण दूर झाली.
संजय राऊत यांनी असंही म्हटलंय की, गुजरात दंगलीच्या खटल्यांमुळे अडचणीत आलेल्या अमित शाह यांना एका व्यक्तीने बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा सल्ला दिला होता. यावेळी शाह आपल्या लहान मुलगा जय याला घेऊन मुंबईत दाखल झाले. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्यांना मातोश्री निवासस्थानाच्या मुख्य गेटवरच अडवण्यात आलं. घामाघूम होऊन त्यांनी बराच वेळ प्रतीक्षा केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा मातोश्रीवर पोहोचलेल्या शाह यांना बाळासाहेबांनी संध्याकाळची वेळ दिली असं पुस्तकात म्हटलंय.
हे ही वाचा >> भूषण गवईंनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी राणेंना दिला झटका, पुण्यातील 'ते' प्रकरण काय?
"दुसऱ्या दिवशी झालेल्या या भेटीत अमित शाह यांनी बाळासाहेबांना गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कार्याची दर्दभरी कहाणी सांगितली. त्यांनी सांगितलं की, सीबीआयच्या तपासामुळे त्यांना अन्यायकारकपणे त्रास सहन करावा लागतोय. न्यायमूर्तींसमोर त्यांचा खटला सुरू आहे. शाह यांनी बाळासाहेबांना विनंती केली की, “आपण बोललात तर न्यायमूर्ती आपलं ऐकतील.” या विनंतीला प्रतिसाद देत बाळासाहेबांनी थेट संबंधित व्यक्तींशी थेट फोनवर संवाद साधला" असं राऊतांनी म्हटलंय.
हे ही वाचा >> 10 अल्पवयीन मुली गर्भवती, महाराष्ट्राला हादरवून टाकणारं बीडमधील नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, फोनवर बोलताना बाळासाहेबांचे शब्द होते, “तुम्ही कोणत्याही पदावर असलात तरी तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका.” या एका फोन कॉलमुळे अमित शाह यांच्या कायदेशीर अडचणी दूर झाल्या आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नव्याने बळ मिळाले असं राऊत यांनी पुस्तकात म्हटलंय. त्यामुळे आता हे पुस्तक आल्यानंतर त्यात काय काय गौप्यस्फोट केले जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
