Baramati double murder case : बारामतीच्या शेरेवाडीतील दोन वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर पोलिसांनी उलगडा केला आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपीने दोन्ही महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले. मात्र, त्यानंतर महिलांनी हालचाल केल्याने आरोपीने कुऱ्हाडीने दोघींच्या गळ्यावर वार केले. या घटनेत इंदुमती मारुती लडकत आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासासाठी तब्बल आठ तपास पथकं तयार करण्यात आली होती. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच दोनशेहून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती पोलिसांनी तपासली.
ADVERTISEMENT
शेजारच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर पडली नजर
तपासादरम्यान पोलिसांची संशयाची सुई शेरेवाडीतीलच विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत याच्यावर स्थिरावली. त्याचे वय 25 वर्षे आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले. दोन्ही महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी घरात प्रवेश केल्याचे आणि त्यानंतर कुऱ्हाडीने वार करून दोघींची हत्या केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत महिलांच्या अंगावरील तब्बल पाच तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या सोन्याची किंमत सुमारे सहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी चोरीला गेलेले सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत.
चोरीचा डाव दोन वृद्ध महिलांच्या हत्येपर्यंत पोहोचला
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला तमाशाचा नाद होता. या नादातून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात असताना त्याची नजर हत्या झालेल्या दोन्ही महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर पडली. दोन्ही महिला रात्री घरात एकट्याच झोपत असल्याची माहिती आरोपीला होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पूजेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन या महिलांच्या घरासमोर करण्यात आले होते. त्यावेळी आरोपीने घराची रेकी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर चोरीचा डाव आखण्यात आला. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी मध्यरात्री आरोपी घरात शिरला. त्याने कपाटातील सोन्याचे दागिने चोरले. मात्र, दोन्ही महिलांनी हालचाल केल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड उचलली आणि त्यांच्या गळ्यावर वार केले.
शेरेवाडीतील या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाल्यानंतर विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत पोलिसांच्या ताब्यात आहे. चोरीसाठी आखलेला डाव दोन वृद्ध महिलांच्या हत्येपर्यंत पोहोचल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्यामागे आणखी काही कारणं किंवा इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ADVERTISEMENT












