भाजप माजी आमदाराला बलात्कार प्रकरणात कोर्टाचा मोठा दणका, पाहा काय घडलं

मिथिलेश गुप्ता

• 06:31 PM • 28 Sep 2026

भिवंडीतील बापगाव फार्महाऊसवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

Mumbai Tak
Google CTA

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील फार्महाऊसवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भिवंडी न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिलासा न देता अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. याआधी देखील कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. तर आता अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणात एका 22 वर्षीय विवाहित महिलेने पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

नरेंद्र पवार यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यापूर्वी न्यायालयाने त्यांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. न्यायालयाने प्रकरणातील आरोप गंभीर असल्याचे नमूद करत तपास यंत्रणा आणि तक्रारदार महिलेची बाजू ऐकणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. 

सुनावणीदरम्यान पोलिसांनी तपासासाठी नरेंद्र पवार यांची अटक आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. फार्महाऊसवरील सीसीटीव्हीचा DVR गायब असल्याचे तसेच कथित घटनेत वापरलेल्या वाहनासह इतर पुरावे तपासासाठी महत्त्वाचे असल्याचे पोलिसांकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 

दुसरीकडे, पवार यांच्या वकिलांनी आरोप फेटाळत तक्रारदार महिलेसोबतच्या कथित चॅट्सचा आधार घेत बचाव पक्षाची बाजू मांडली. नरेंद्र पवार यांनीही या प्रकरणातील आरोप यापूर्वी फेटाळले आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता नरेंद्र पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे पडघा पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील सहआरोपी शैलेश पाटील याचाही पोलीस शोध घेत आहेत.