भाजपच्या माजी आमदाराची 70 ते 80 जणांकडून हत्या, संतापलेला जमाव अन्... नेमकं घडलं तरी काय?

मुंबई तक

• 12:40 PM • 12 Oct 2026

राजस्थानच्या भरतपूरमध्ये भाजपचे माजी आमदार अतर सिंह भडाना यांचा क्रशर प्लांटवरील वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. 70 ते 80 जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

bjp former mla atar singh bhadana killed bharatpur crusher plant dispute

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

भरतपूर: भाजपच्या एका माजी आमदाराला हिंसक जमावाने बेदम मारहाण करत त्याचा जीव घेतल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील भरतपूर येथे भाजपचे माजी मंत्री अतर सिंह भडाना यांच्यासोबत क्रशर प्लांट पुन्हा सुरू करण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर गावकऱ्यांच्या एका गटाने हल्ला जीवघेणा हल्ला केला. ज्यामध्ये भडाना यांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

वैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोंधा गावातील क्रशर प्लांटमध्ये 70 ते 80 लोकांनी भडाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भडाना यांचा रात्री सुमारे 11.30 वाजता जयपूरच्या SMS रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून सध्या तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

11 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी सुमारे 6.00 वाजेच्या सुमारास अतर सिंह भडाना हे भोंधा गावातील त्यांच्या क्रशर प्लांटमध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास वर्षभरापासून बंद असलेला क्रशर पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. या दरम्यान, गावकरी आणि भडाना यांच्या बाजूचा वाद वाढला आणि त्याचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले.

हे ही वाचा>> 'मोदी-शाहांच्या मनात अत्यंत पराकोटीची...', राज ठाकरेंचा प्रचंड संताप अन् जोरदार हल्लाबोल!

असा आरोप आहे की, या संघर्षादरम्यान मोठ्या संख्येने लोकांनी काठ्या आणि दगडांनी अतर सिंह यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये अतर सिंग भडाना आणि त्यांचे सहकारी गगन शर्मा हे गंभीररित्या जखमी झाले.

सुरुवातीला दोघांनाही वैरा उप-जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण भडाना यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जयपूरला आणि गगन शर्मा यांना भरतपूरला हलवण्यात आले. मात्र, जयपूरच्या SMS रुग्णालयात उपचारादरम्यान भडाना यांचे निधन झाले.

माहिती देऊनही कारवाई न केल्याचा पोलिसांवर आरोप

भडाना यांच्या पत्नी कमलेश यांनी या प्रकरणात पोलीस आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, क्रशरचे लीज कनेक्शन कापण्यात आले होते, पाण्याचा पंप खराब करण्यात आला होता आणि लीजसाठी भेट देणाऱ्या लोकांना हाकलून लावले जात होते.

भाजपचे माजी आमदार अतर सिंह भडाना यांची जमावाकडून निर्घृण हत्या

कमलेश यांनी पोलिसांना दोष देत म्हटले, "या घटनांची माहिती पोलीस आणि प्रशासनाला सातत्याने दिली जात होती, परंतु कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही." त्यांनी असाही दावा केला की, रविवारी संध्याकाळी 6.30 ते 7 वाजेच्या दरम्यान 70-80 लोकांनी तिच्या पतीवर आणि इतरांवर हल्ला केला.

हे ही वाचा>> 'जे करायचे आहे ते करा, 10 हजार, 20 हजार, 50 हजार पोलीस..', राहुल गांधीचा CJP च्या आंदोलनावरील Video

अतर सिंह यांच्या पत्नीने असाही दावा केला आहे की, त्यांच्या पतीला गोळीही लागली होती. तथापि, वैरा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक तपासात गोळी लागल्याची शक्यता नाकारली आहे.

चार वर्षांच्या वैमनस्यातून हत्या

क्रशर प्लांटवरून बराच काळ वाद सुरू होता. पोलीस ठाण्याचे प्रभारी धीरेंद्र सिंग यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे चार वर्षांपूर्वी क्रशर ऑपरेटर आणि गावकऱ्यांमध्ये वाद आणि झटापट झाली होती.

क्रशरसाठी कुरण जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले असून अवैध खाणकाम सुरू असल्याचा गावकऱ्यांचा आरोप होता. भाडेपट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतही वाद होता.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ते गेल्या दोन वर्षांपासून क्रशर प्लांटविरोधात आंदोलन करत आहेत. क्रशर वर्षभरासाठी बंद होता आणि तो पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. रविवारी भडाना प्लांटवर आल्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला.

आंदोलनस्थळावरून हटवल्याचा गावकऱ्यांचा आरोप

क्रशर पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाविरोधात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून गावकरी शांततेने आंदोलन करत असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे.

त्यांच्या दाव्यानुसार, रविवारी संध्याकाळी भडाना सुमारे 40 ते 50 लोकांना घेऊन घटनास्थळी आले आणि त्यांनी गावकऱ्यांना आंदोलनस्थळावरून हटवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे हाणामारी झाली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे दोन्ही बाजूंनी काठ्या आणि दगडांनी मारामारी झाली. या संघर्षात भडाना गंभीर जखमी झाले.

पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत

पोलीस ठाणेदारांनी सांगितले की, या घटनेसंदर्भात दोन्ही पक्षांकडून कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या वादादरम्यान गोळीबार झाला होता का आणि त्यात किती लोक जखमी झाले, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

माजी आमदारांच्या निधनानंतर या घटनेला गंभीर वळण लागले आहे. गावात पोलीस दल तैनात करण्यात आले असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. पोलीस आता या प्रकरणात पुढील कारवाई करत असून, यात सामील असलेल्यांचा शोध घेत आहेत.