CJP Protest Live Update : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज, 20 जुलै 2026 रोजी सुरुवात होत असतानाच नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाविरोधात कॉकक्रोच जनता पार्टी (CJP) ने मोठ्या 'चलो संसद' मार्चला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, यावेळी रॅपिड अॅक्शन फोर्सकडून बळाचा वापर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात येतोय. आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र तरीही संसदेवर जाण्यासाठी आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
कॉकरोच जनता पार्टीचे आणि विद्यार्थी आंदोलक संसदेजवळ पोहोचू लागल्याचं दिसताच त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. शिवाय, संसदेजवळ बंदोबस्त वाढवण्यात आलाय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक झाले असून सीजेपीचं शिष्टमंडळ जे पी नड्डांच्या भेटीला पोहोचले आहे.
अभिजीत दिपकेचं उपोषण मागे
नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके याने पाणी पिऊन उपोषण सोडलं आहे. गेल्या काही तासांपासून अभिजीत दिपके यांनी उपोषण केलं होत, मात्र त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याने आपलं उपोषण सोडलं.
आंदोलकांवर लाठीचार्ज, सरकारकडून बळाचा वापर
मार्चदरम्यान आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला असून रॅपिड अॅक्शन फोर्सकडून बळाचा वापर केला जात आहे. आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लाठीचार्ज आणि बळाचा वापर झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फोर्सकडून आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात येत असून त्यांना पांगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अडवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून येत आहे. आंदोलनाकडे घेऊन जाणारी मेट्रोसेवा बंद करण्यात आली आहे. शिवाय, आंदोलनस्थळी जामर लावण्यात आले आहेत.
अभिजीत दिपकेंकडून आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांकडून संसदेवर जाण्यासाठी घोषणाबाजी सुरूच असल्याचे दिसून आले. त्यामुळे 'चलो संसद' मार्चदरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम असून आंदोलन आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यातील सामना सुरू असल्याचे चित्र आहे.
ADVERTISEMENT












