Devendra Fadnavis, Mumbai : अकोला आणि अंबरनाथमधील स्थानिक राजकारणात भाजपने केलेल्या आघाड्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने AIMIM सोबत हातमिळवणी केली, तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोबत भाजप सत्तेत सहभागी झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर ठाम शब्दांत प्रतिक्रिया देत सांगितले की ,"मी स्पष्ट शब्दात सांगतोय की, काँग्रेस आणि AIMIM सोबत कसलीही युती चालणार नाही. ही युती तोडावी लागेल. स्थानिक पातळीवर कोणी अशी युती केली असेल तर ती चुकीची आहे. तिथे अनुशासन नाही. याच्यावर कारवाई होईल. हे चालणार नाही. मी याबाबत आदेश दिले आहेत", असे फडणवीस म्हणाले.
अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत युती
दरम्यान, अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपद मिळवल्यानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. सर्वाधिक 27 नगरसेवक असलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोबत मिळून ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या नव्या गटात भाजपचे 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी (अजित पवार) चे 4 आणि एक अपक्ष असा मिळून 31 नगरसेवकांचा समावेश आहे. नगराध्यक्ष धरून एकूण संख्या 32 होते. भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त कारभारासाठीच हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या वातावरणात शिंदेसेनेसाठी ही घडामोड मोठा धक्का मानली जात आहे.
अकोल्यात भाजपची AIMIM सोबत युती झाल्याने खळबळ
दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेतील आघाडीने अधिकच खळबळ उडवली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या माया धुळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असल्या तरी, पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. 35 सदस्यांच्या नगरपालिकेत 33 जागांसाठी निवडणूक झाली असून भाजपला 11 जागांवर समाधान मानावे लागले. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आपल्या नेतृत्वाखाली ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला असून या मंचात AIMIM सह विविध पक्षांचा समावेश करण्यात आला आहे.
या आघाडीत AIMIMचे 5 नगरसेवक, दोन्ही शिवसेना गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी झाला आहे. या नव्या आघाडीची नोंदणी नुकतीच अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर या आघाडीचे गटनेते असणार असून, सर्व घटक पक्षांना भाजपचा व्हिप पाळावा लागणार आहे. 13 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी एकत्र मतदान करणार आहे.
सध्या या आघाडीला 33 पैकी 25 नगरसेवकांचा पाठिंबा असून नगराध्यक्षा धरून एकूण संख्या 26 होते. विरोधी बाकांवर काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 नगरसेवक राहणार आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे यांनी AIMIMच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. तरीही सत्तेसाठी AIMIM सोबत आघाडी केल्याने भाजपवर विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट आदेशांनंतर स्थानिक पातळीवरील या आघाड्यांचे पुढे काय होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











