Dhruv Rathee first reaction after released by police : सीजेपीच्या आंदोलनासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या यूट्यूबर ध्रुव राठीला पोलिसांनी शनिवारी (दि.10) सकाळी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी (दि.11) पहाटे तीन वाजता त्याची सुटका केली. जंतर-मंतरवर येण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला. सुटकेनंतर ध्रुव राठीने एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये त्याने स्वतःसोबत घडलेल्या घटनांबाबत भाष्य केलं आहे. तसेच, आपल्याला ताब्यात घेण्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत त्याने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोन्यासारखी मुलगी जन्माला आली, पण आईवडिलांना नकोशी झाली; दोनच दिवसात केली भयंकर हत्या
परदेशी पासपोर्टधारक असल्याच्या चर्चा खोट्या- ध्रुव राठी
ध्रुव राठीने व्हिडीओच्या सुरुवातीला गेल्या 24 तासांत पाठिंबा दिलेल्या लोकांचे आभार मानले. त्यानंतर त्याने भारतीय नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण दिलं. आपल्याकडे भारतीय पासपोर्ट असून आपण भारतीय नागरिक आहोत आणि कायम राहणार आहोत, असं त्याने सांगितलं. आपण परदेशी पासपोर्टधारक असल्यामुळे आंदोलनात सहभागी होऊ शकत नसल्याच्या चर्चा खोट्या असल्याचा दावाही त्याने केला. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास आपण घरात झोपलेलो असताना साध्या कपड्यांतील सुमारे 20 जण घरात घुसल्याचा आरोप त्याने केला. त्यावेळी घरात आई-वडील आणि आपण असे तिघेच होतो, असंही त्याने सांगितलं. हे लोक थेट आपल्या बेडरूममध्ये आले आणि प्रतिक्रिया देण्याची संधी न देता आपल्याला बाहेर घेऊन गेले, असा दावा त्याने केला.
हेही वाचा :'देव मानू नकोस, देव म्हणजे सगळं काही नाही...' बायकोची कुऱ्हाडीने वार करुन हत्या; नवरा फरार
आई-वडिलांचे फोन काढून घेण्यात आल्याचा आरोप
आपल्याला घरातून नेताना चप्पल घालण्याचीही संधी देण्यात आली नाही, असं ध्रुव राठीने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. या प्रकारात आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापती झाल्याचा दावाही त्याने केला. त्यानंतर आपल्याला एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. या काळात आपला फोन आणि आई-वडिलांचे फोन काढून घेण्यात आल्याचा आरोप त्याने केला. तसेच, वकिलाशी बोलण्याची आणि फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली नाही, असंही त्याने सांगितलं. सुमारे 22 ते 23 तास आपल्याला ताब्यात ठेवण्यात आलं, असा दावा करत त्याने या कारवाईला अटक किंवा ताब्यात घेण्याऐवजी ‘किडनॅपिंग’ असं संबोधलं. आपण कोणताही कायदा मोडला नसताना आणि निवडणूक आयोगात सुधारणा करण्याची मागणी करत असताना आपल्यासोबत असा प्रकार घडल्याचा आरोप त्याने केला.
या व्हिडीओमध्ये ध्रुव राठीने देशातील लोकशाही आणि नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबतही प्रश्न उपस्थित केले. नरेंद्र मोदी यांनी देशाला हुकूमशाहीकडे नेल्याचा आरोप करत त्याने या परिस्थितीला ‘अनधिकृत आणीबाणी’ असं म्हटलं. अभिजीत, सौरभ दास आणि आशुतोष यांनाही अशाच प्रकारे ताब्यात घेतल्याचं नंतर समजल्याचं त्याने सांगितलं. सात हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेतल्याचाही दावा त्याने केला. सध्या आपण ठीक असून, आपल्यावर नजर ठेवण्यासाठी सुमारे 15 लोक तैनात असल्याचा आरोपही त्याने केला. आपल्याला घराबाहेर पडता येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचं त्याचं म्हणणं आहे. मात्र, अशा कारवाईमुळे आपण देशासाठी आवाज उठवणं थांबवणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. तसेच, आपल्या सुटकेसाठी उपोषणाचा इशारा दिल्याबद्दल सोनम वांगचुक यांचे आभार मानत त्याने व्हिडीओचा शेवट केला.
ADVERTISEMENT












