Drone Strike: भारताचा पाकिस्तानवर दुसरा मोठा हल्ला, थेट लाहोरपर्यंत मारली मजल, Air डिफेन्स सिस्टमच टाकली उखडून!

India Drone Strike on Pak: भारताने लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली आहे. ड्रोन स्ट्राईकच्या माध्यमातून आता भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे.

Drone Strike: भारताचा पाकिस्तानवर दुसरा मोठा हल्ल

Drone Strike: भारताचा पाकिस्तानवर दुसरा मोठा हल्ल

मुंबई तक

• 03:27 PM • 08 May 2025

follow google news

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना काल (7 मे) भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करत  पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. ज्यामध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने आता भारतावर छुपे हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आज (8 मे) पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. भारताने आज ड्रोन स्ट्राइक (Drone Strike)करत थेट लाहोरपर्यंत मजल मारली आहे. 

हे वाचलं का?

'ऑपरेशन सिंदूर' सुरू केल्यानंतर, पाकिस्तान सतत बदला घेण्याबद्दल बोलत आहे. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याच्या हवाई संरक्षण युनिटला सियालकोट, लाहोर आणि पाकिस्तानच्या आणखी एका शहरात मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताने ड्रोन स्ट्राईक करत लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणालीला निष्क्रिय केल्याचं माहिती विश्वसनीयरित्या समजते आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातील 9 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे. लाहोर व्यतिरिक्त, गुजरांवाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियांवाली, कराची, चोर, मियांओ आणि अट्टॉक येथेही ड्रोन स्ट्राईक करण्यात आला आहे.

भारताचा दुसरा हल्ला, सरकारकडून निवेदन जारी

भारत सरकारने एक अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, "आज सकाळी, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. कारण काल रात्री उशिरा पाकिस्तानकडून अशा पद्धतीचे हल्ले हे भारतावर केले होते. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे हे हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले.'

निवेदनात पुढे म्हटले आहे की, '7 आणि 8 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने हे हल्ले काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालीच्या सहाय्याने निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत, जे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे आहेत.'

पीआयबीच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, "आज, 8 मे रोजी सकाळी, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारतानेही पाकिस्तानइतक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले आहे. लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्याचे विश्वसनीयरित्या कळते."

जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने मोर्टार आणि तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे, असेही त्यात म्हटले आहे.

भारत सरकारने निवेदनात पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानच्या गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथेही पाकिस्तानकडून होणारा हल्ला थांबविण्यासाठी भारताला प्रत्युत्तर द्यावे लागले.

रॉयटर्स आणि स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, लाहोरमधील वॉल्टन विमानतळाजवळ मोठ्या स्फोटांची मालिका ऐकू आली, ज्यामुळे सायरन वाजले आणि लोक घराबाहेर पडले. फोटो आणि व्हिडिओमधून, लोक घाबरून घराबाहेर पडताना दिसत होते आणि त्यांना धुराचे लोट दिसले.

    follow whatsapp