ADVERTISEMENT
जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या शिवराम नगरमधील मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता, आणि आता खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी सहा ते सात तोळे सोने आणि सुमारे 35 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांचा जळगावमधील बंगला बंद होता. नेहमीप्रमाणे सकाळी कर्मचाऱ्याने बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेल्यावर कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याला दिसले. त्याने तत्काळ खडसे यांना कळवले आणि खडसे यांनी पोलिसांना माहिती दिली.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, “रात्री घरफोडी झाली असून बंगल्यातील सर्व खोल्यांची कुलुपं तोडून चोरी करण्यात आली आहे. माझ्या खोलीत ठेवलेले 35 हजार रुपये आणि चार सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी 5 ग्रॅम) चोरीला गेल्या आहेत. तसेच, खाली राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरातूनही सुमारे पाच तोळे सोने लंपास झाले आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली असावी.”
खडसे यांनी पोलिसांवर आणि राज्य सरकारवरही टीका करताना म्हटलं की, “जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडे, दोन नंबरचे व्यवहार वाढले आहेत. पोलिसांवर टीका केली की स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात. अशा गंभीर घटनांकडे पोलिस आणि सरकार गांभीर्याने पाहत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरही दरोडा
या घटनेच्या केवळ काही दिवसांपूर्वी, म्हणजेच 9 ऑक्टोबरच्या रात्री, मुक्ताईनगर आणि वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडा पडला होता. यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या ‘रक्षा फ्युअल’ पेट्रोल पंपाचाही समावेश होता. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मिळून एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
या प्रकरणात जळगाव पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून नाशिक व अकोला जिल्ह्यात छापे टाकले. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल बावस्कर, देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका अल्पवयीनाला अटक करण्यात आली होती. सलग घडणाऱ्या या दोन घटनांमुळे जळगाव जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपवाले भुरटे चोर', आता खासदार उदयनराजे भोसलेंचं प्रत्युत्तर
ADVERTISEMENT











